ऑफस्पिनरची भारतात वानवा! हरभजन सिंगचे परखड मत; वर्कलोडवरूनही संघ व्यवस्थापनाला सुनावले

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारीत झालेल्या मालिकेनंतर निवृत्ती जाहीर केली. दोन महिन्यांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेकडून भारताला कसोटी मालिकेत आपल्याच घरात व्हाइटवॉश पत्करावा लागला.
ऑफस्पिनरची भारतात वानवा! हरभजन सिंगचे परखड मत; वर्कलोडवरूनही संघ व्यवस्थापनाला सुनावले
संग्रहित छायाचित्र
Published on

ऋषिकेश बामणे/मुंबई

भारतीय क्रिकेट संघात सध्या तिन्ही प्रकारांत खेळू शकेल, अशा दर्जेदार ऑफस्पिनरची उणीव आहे. अष्टपैलू खेळाडूंना खेळवण्याच्या प्रयत्नात आपण दर्जेदार गोलंदाजांचा बळी देत आहोत, असे परखड मत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने नोंदवले. त्याशिवाय खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटच्या (खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन) नावाखाली देण्यात येणाऱ्या विश्रांतीवरही हरभजनने टीका केली आहे.

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारीत झालेल्या मालिकेनंतर निवृत्ती जाहीर केली. दोन महिन्यांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेकडून भारताला कसोटी मालिकेत आपल्याच घरात व्हाइटवॉश पत्करावा लागला. अश्विनच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ ऑफस्पिनर म्हणून वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य देत असला, तरी त्याच्यावर फलंदाजीचासुद्धा भार आहे. तसेच त्याच्या तंदुरुस्तीचीही चिंता असते. सुंदर नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय व टी-२० मालिकेतूनसुद्धा बाहेर पडला. त्यामुळे तो टी-२० विश्वचषकाला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ४५ वर्षीय हरभजनने भारताला दर्जेदार ऑफस्पिनरची गरज असल्याचे सांगितले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमानिमित्त हरभजनने नवशक्तिशी संवाद साधला.

“मी मागेसुद्धा म्हटले होते की भारताकडे दर्जेदार ऑफस्पिनर नाही. जणू ऑफस्पिनर्सचा दुष्काळ पडला आहे. आपण अष्टपैलूंना प्राधान्य देत आहोत. मात्र पूर्णपणे ऑफस्पिन गोलंदाजीच्या बळावर संघात स्थान मिळवू शकेल, असा सध्या गोलंदाज नाही. मी सध्या देशांतर्गत क्रिकेट इतके पाहिलेले नाही, मात्र काही वर्षांपूर्वी विदर्भाचा अक्षय वाखारे हा ऑफस्पिनर मला भारतीय संघाकडून खेळेल, असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही,” असे हरभजन म्हणाला. उजव्या हाजाने ऑफस्पिन गोलंदाजी करणाऱ्या हरभजनने स्वत: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००हून अधिक बळी मिळवले आहेत. त्यामुळेच त्याने संघ व्यवस्थापनाला ऑफस्पिनर्सकडे लक्ष देण्याचे सुचवले आहे.

“ऑफस्पिन गोलंदाजी करणे सर्वात सोपे असते, असे अनेकांचा समज आहे. मात्र हीसुद्धा एक कला असते. ऑफस्पिन करणे सोपे असते, तर मग आपल्याला आतापर्यंत कसोटी संघात खेळू शकेल, असा फिरकीपटू गवसला असता. त्यामुळे निवड समिती अष्टपैलूंना संधी देत असली, तरी त्यांनी परिपूर्ण ऑफस्पिनर घडवण्याकडेही लक्ष द्यावे,” असे हरभजनने ठामपणे सांगितले.

दरम्यान, सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असून त्यानंतर त्यांच्यात टी-२० मालिका होईल.

बुमरा, हार्दिकला हरभजनचा सल्ला

यंदा टी-२० विश्वचषक होणार असल्याने भारतीय संघ गेल्या काही काळापासून तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला फक्त टी-२० प्रकारात खेळवत आहे. तसेच अष्टपैलू हार्दिक पंड्यालाही टी-२० मालिकेसाठीच संधी देण्यात येत आहे. बुमरा तर २०२३च्या विश्वचषकातील अंतिम फेरीनंतर एकदिवसीय सामनाच खेळलेला नाही. त्यामुळे खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट करण्यात येत असले, तरी खेळाडूंनी संघाची गरज ओळखून शक्य होईल तेव्हा खेळावे, असेही हरभजनला वाटते. “कोणत्या खेळाडूची तंदुरुस्ती कितपत आहे, हे मी सांगू शकत नाही. याविषयीचा निर्णय संघ व्यवस्थापनावर असतो. मात्र जर एखादा खेळाडू तंदुरुस्त असला, तरी तुम्ही त्याला फक्त एकाच प्रकारात खेळवत असाल, तर यामुळे संघाचे नुकसान होऊ शकते. खेळाडूनेसुद्धा शक्य होईल तेव्हा खेळण्यास सज्ज रहावे. कारण हेच वय असते अधिकाधिक लढतींमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे. एकदा फॉर्म हरवला किंवा दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यावर पुनरागमन करणे फार कठीण असते. निवृत्तीनंतर या गोष्टीची खंत राहायला नको,” असे हरभजन ठामपणे म्हणाला.

भारताला पुन्हा विश्वविजयाची संधी

फेब्रुवारीत रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला नक्कीच विश्वविजेतेपद राखण्याची उत्तम संधी आहे, असे हरभजनला वाटते. “सूर्यकुमार यादवच्या कामगिरीची मला चिंता नाही. तो विश्वचषकात नक्कीच छाप पाडले. तसेच भारताकडे सर्वोत्तम संघ असून ते टी-२० विश्वचषक पुन्हा उंचावू शकतात. भारतातच हा विश्वचषक होणार असल्याने आपल्याला चाहत्यांचाही पाठिंबा लाभेल,” असेही हरभजनने सांगितले. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला होता.

विराटवरून मांजरेकरांवर निशाणा

एकदिवसीय प्रकारात धावा करणे सर्वात सोपे आहे. त्यामुळेच विराट येथे ५०हून अधिक सरासरीने धावा करत आहे, असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी नोंदवले होते. यावरून हरभजनने मांजरेकरांवर निशाणा साधला. “मांजरेकर यांना मी काय बोलू. क्रिकेटचा प्रकार कोणताही असला, तरी त्यामध्ये धावा करणे गरजेचे असते. असे असते, तर प्रत्येक फलंदाजाने दरवेळी शतक साकारले असते. विराट भारताला लाभलेल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याविषयी असे भाष्य करणे मला काहीसे चुकीचे वाटते. विराट आजही कसोटीत परतला, तर भारताचा सर्वोत्तम फलंदाज असेल,” असे हरभजन म्हणाला. तसेच एकदिवसीय प्रकारात विराटने असेच खेळत रहावे, असेही त्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in