मेस्सी ३९ व्या वर्षी खेळू शकतो, तर विराट-रोहित का नाही : हरभजन सिंग

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ३९व्या वर्षी अर्जेंटिनाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, तर आपले रोहित शर्मा, विराट कोहली २०२७चा एकदिवसीय विश्वचषक का खेळू शकत नाहीत, असा सवाल भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने उपस्थित केला आहे.
मेस्सी ३९ व्या वर्षी खेळू शकतो, तर विराट-रोहित का नाही : हरभजन सिंग
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ३९व्या वर्षी अर्जेंटिनाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, तर आपले रोहित शर्मा, विराट कोहली २०२७चा एकदिवसीय विश्वचषक का खेळू शकत नाहीत, असा सवाल भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने उपस्थित केला आहे.

संघात निवडीचा निकष वय नसून खेळाडूची कामगिरी आणि फिटनेस असावा, असे सांगत ४६ वर्षीय हरभजनने रोहित आणि विराट या दिग्गजांच्या बाजूने जोरदार फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळी रोहित ४० वर्षांचा, तर विराट ३९ वर्षांचा असणार आहे. वैभव सूर्यवंशीसारख्या नवोदित खेळाडूंपेक्षा रोहित आणि विराट यांच्यावर अपेक्षांचे मोठे ओझे असेल. विराट ३९ वर्षांचा झाला तरी मैदानावर तो २० वर्षांच्या खेळाडूंना मागे टाकत असेल तर त्याचे वय महत्त्वाचे ठरत नाही. जसे मेस्सीला ३९व्या वर्षीही पाच प्रतिस्पर्धी खेळाडू रोखू शकत नाहीत, तसेच कौशल्य आणि फिटनेस रोहित व विराटमध्ये असल्याचे हरभजनने नमूद केले.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या दोघांच्या ३०० हून अधिक सामन्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवावा, असा सल्ला हरभजनने दिला. “रोहित आणि विराट श्रेयस अय्यर किंवा यशस्वी जैस्वाल यांच्याएवढा फिटनेस सिद्ध करून धावा करत असतील, तर इतर कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही,” असे तो म्हणाला.

भारतीय संघात जिंकण्याची मानसिकता निर्माण करण्यात आणि फिटनेस संस्कृती आणण्यात विराटाचा ९० टक्के वाटा आहे. २०१४-१५मध्ये कर्णधार झाल्यानंतर विराटनेच ४०० धावांचा पाठलाग करण्याचा आणि विजयासाठी खेळण्याचा आत्मविश्वास संघाला दिला, असे हरभजनने आठवून सांगितले. सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे.

गंभीरची शैली काहींसाठी भीतीदायक!

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर होत असलेल्या सततच्या टीकेमुळे हरभजनने आश्चर्य व्यक्त केले आहे. कटू सत्य तोंडावर बोलण्याची गंभीरची शैली सर्वांनाच पचेल असे नाही, अशा शब्दांत हरभजनने आपल्या या माजी सहकाऱ्याची भक्कम बाजू मांडली. “गंभीर हा एक अत्यंत आक्रमक आणि मनापासून काम करणारा माणूस आहे. तो आपले विचार थेट मांडतो आणि त्याची हीच शैली काहींसाठी अस्वस्थ करणारी ठरू शकते. त्याचे मनात एक आणि वर्तनात दुसरे असे नसते. गंभीरवर उगाच सातत्याने निशाणा साधला जात आहे,” असे हरभजनने नमूद केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in