आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळणे कठीणच!

भारताचा माजी क्रिकेटपूट मोहम्मद कैफचे सूचक विधान
आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळणे कठीणच!

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही एक फ्रँचायझी आधारित स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येक संघमालकाला त्यांच्या प्रमुख खेळाडूंनी विश्रांती घेऊ नये असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेदरम्यान त्यांना विश्रांती मिळेल, असा विचार करणे चुकीचे आहे, असे रोखठोक मत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने व्यक्त केले.

इंडियन मास्टर्स टी-१० स्पर्धेच्या पहिल्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कैफ आणि रॉबिन उथप्पा हे भारताचे माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. यावेळी त्याने आयपीएल, एकदिवसीय क्रिकेटचे भवितव्य, कसोटी क्रिकेटमधील रंजकता यांसारख्या विषयांवर भाष्य केले. ३१ मार्चपासून आयपीएलच्या १६व्या हंगामाला प्रारंभ झाला असून भारताचे सर्व प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळत आहे. जून महिन्यात भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना तर, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळायची आहे. अशा स्थितीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रमुख भारतीय खेळाडूंनी त्यांना वाटल्यास नक्की विश्रांती घ्यावी, असे मत काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. वर्कलोड मॅनेजमेंटचे महत्त्व त्यांनी ओळखावे, असेही तो म्हणाला होता. परंतु कैफने मात्र यासंबंधी काहीसे वेगळे मत व्यक्त केले आहे.

“आयपीएलमध्ये प्रत्येक संघमालक त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंनी सर्व सामने खेळावे, अशी इच्छा बाळगून असतो. मी स्वत: दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनाचा सदस्य होतो. अनेकदा एक लढत गमावल्यामुळे काही संघांना बाद फेरीला मुकावे लागल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे फ्रँचायझी तरी स्वत:हून कोणत्याही भारतीय खेळाडूला विश्रांती देणार नाही. एकदमच खेळाडूला गरज असेल, तर ते यासंबंधी विचार करू शकतात. परंतु भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये विश्रांतीचा विचार न केलेलाच बरा,” असे ४२ वर्षीय कैफ म्हणाला.

त्याशिवाय यंदा प्रत्येक संघाला होम आणि अवे म्हणजेच एक लढत घरच्या तर एक प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळायची असल्याने खेळाडूंची आणखी शारीरिक दमछाक होईल, असेही कैफने नमूद केले. गेली २-३ वर्षे कोरोनामुळे खेळाडूंना आयपीएल दरम्यान इतका प्रवास करावा लागला नव्हता.

एकदिवसीय प्रकारात बदल करण्याची गरज नाही!

एकदिवसीय प्रकार ५० षटकांचाच उचित असून यामध्ये कोणताही बदल करणे गरजेचे नाही. आगामी एकदिवसीय विश्वचषकात चाहत्यांना या प्रकाराचे महत्त्व पुन्हा समजेल, असे कैफ म्हणाला. एक क्रिकेट चाहता म्हणून मला सर्व प्रकारच्या फॉरमॅटचे सामने पाहायला आवडतात. कसोटी क्रिकेट आता वेगवान होत असले तरी यामुळे एकदिवसीय सामन्यांचे महत्त्व कमी होत नाही, असेही कैफने आवर्जून सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in