मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यांमध्ये केलेला १५ हजार ९२१ धावांचा विक्रम मोडण्यासाठी आणखी खूप धावा करायच्या आहेत. हा विक्रम मोडणे सर्वात कठीण आहे, असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
एका मुलाखतीत गावसकर म्हणाले की, जो रूटचे वय सचिनला विक्रम मोडण्यास अनुकूल आहे. जर त्याने धावा करण्याचा हा उत्साह कायम ठेवला तर तो हे रेकॉर्ड मोडू शकतो. पण खूप काळ खेळल्यास तुमचा फॉर्म देखील जाऊ शकतो. कारण मानसिक थकवा येतोच. रूट सध्या दीडशे धावांपेक्षा जास्त धावा करीत आहे. याचा कधी ना कधी त्याच्या मानसिकतेवर आणि शरीरावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
गावसकरांनी याबाबत सर्वाधिक कसोटी विकेटच्या विक्रमाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, खेळात काहीही होऊ शकते. आपल्याला सुरूवातीला रिचर्ड हेडलींचे ४३१ विकेट्सचे रेकॉर्ड मोडले जाणार नाही. असे वाटत होते. मात्र कर्टनी वॉल्शने ५१९ विकेट घेतल्या. त्यामुळे रेकॉर्ड मोडणे अशक्य नाही मात्र खूप खूप कठिण आहे.
सचिन तेंडुलकरने २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून त्यात दोनशे कसोटी सामन्यांमध्ये १५ हजार ९२१ धावा केल्या. त्याची सरासरी ५३ आहे. सचिनने कसोटीत ५० पेक्षा जास्त शतके ठोकली.
गावसकर हे कसोटीत १० हजार धावा पूर्ण करणारे भारताचे पहिले फलंदाज ठरले. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने देखील कसोटीत १० हजार धावा पूर्ण करण्याचा मान पटकाविला. अनेक आजी माजी क्रिकेटर जो रूट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडणार का, अशी चर्चा करत असताना गावसकर यांनी देखील आपले मत व्यक्त केले.