भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने शुक्रवारी (दि.१९)अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात स्फोटक फलंदाजी करत धुमाकूळ घातला. हार्दिकने ५ षटकार आणि ५ चौकारांच्या जोरावर २५ चेंडूंमध्ये ६३ धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. याबरोबरच ३-१ ने मालिकाही जिंकली. मात्र, सामन्यादरम्यान हार्दिकने मारलेल्या जोरदार षटकारामुळे सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या एका कॅमेरामॅनला दुखापत झाली. यानंतर, हार्दिकने जे केलं त्याच्या कृतीचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
सूर्यकमार बाद झाल्यानंतर, हार्दिक पांड्या मैदानावर आला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉश गोलंदाजी करत होता. हार्दिकची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर लॉन्ग ऑफच्या दिशेने जोरदार फ्लॅट शॉट खेळला. हा चेंडू थेट सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या कॅमेरामॅनच्या हाताला लागला. चेंडू इतक्या जोरात लागला की तो क्षणभर वेदनेने कळवळला. यानंतर, डगआउटमध्ये बसलेले प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ताबडतोब संघाच्या फिजिओला त्याच्याकडे पाठवले आणि कॅमेरामनची विचारपूस केली. सुदैवाने कॅमेरामॅनने स्वतः सांगितले की, "काही नाही झालं!" (कुछ नही हुआ) त्यानंतर त्याच्या जखमेवर बर्फ लावण्यात आला.
मोठ्या मनाचा हार्दिक
सामना संपताच हार्दिक पांड्या तात्काळ कॅमेरामॅनकडे धावत गेला. त्याने कॅमेरामॅनची विचारपूस केली. यानंतर, त्याने स्वतः त्याच्या हातावर बर्फाचा पॅक लावायला मदत केली. त्यानंतर मनापासून माफी मागत त्याला मिठी मारली. तसेच, त्याची तब्येत ठीक आहे याची खात्री केली. हार्दिकच्या या हृदयस्पर्शी कृतीचा व्हिडिओ काही सेकंदातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हार्दिकने मानले देवाचे आभार
कॅमेरामॅनची विचारपूस केल्यानंतर हार्दिक म्हणाला की, “देवाची माझ्यावरही कृपा होती की चेंडू जास्त वर लागला नाही. चेंडू जिथे लागला उद्या तिथे नक्कीच निळं पडेल, पण तो खूप नशिबवान आहे. पण जर चेंडू खांद्याच्या वरच्या बाजूला लागला असता तर त्याला मोठी दुखापत झाली असती. त्यामुळे मी खूप आभारी आहे की, असं काही घडलं नाही. मला खूप काळजी वाटली, कारण चेंडू खूप जोरात लागला. मला तेव्हा वाटलं की, मी त्याच्याकडे जाऊन माफी मागावी आणि त्याची तब्येत ठीक आहे का ते पाहावं. कारण, गेली १०-११ वर्षे मी त्याला मैदानात पाहतो आहे, त्यामुळे मला त्याची काळजी वाटली.”
हार्दिक ठरला ‘प्लेअर ऑफ द मॅच’
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमनेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने २३१ धावा केल्या. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी मधल्या फळीत भारताचा डाव सांभाळत मोठी भागीदारी केली.२३२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनेही चांगली सुरुवात केली. आफ्रिकाने, ७ व्या षटकात ६९ धावांवर पहिला विकेट गमावला. यानंतर, भारताच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केले. वरुण चक्रवतीने ४ तर बुमराहने २ विकेट्स घेतले. भारताने अखेर हा सामना ३० धावांनी जिंकत मालिका जिंकली. हार्दिक पांड्या त्याच्या तुफानी फलंदाजी आणि सामन्यातील प्रभावी प्रदर्शनामुळे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला.