हार्दिक पंड्याने केली बुमराहच्या शैलीची नक्कल

हार्दिकने हा व्हिडीओ पोस्ट करत बुमराहला विचारले आहे की, ‘कसा आहे फॉर्म... बूम?’
हार्दिक पंड्याने केली बुमराहच्या शैलीची नक्कल

आशिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ दुबईला पोहोचताच जोरदार तयारीला लागला आहे. सर्व खेळाडू तयारीत गुंतले असतानाच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने नेटमध्ये सराव करताना आपलाच सहकारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची चक्क नक्कल केली. हार्दिकने नंतर त्याच्या इन्स्टा अकाउंटवर सराव सत्राचा व्हिडीओ पोस्ट केला.

हार्दिकने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो बुमराहच्या अ‍ॅक्शनमध्ये गोलंदाजी करताना आणि बुमराहच्याच शैलीत सेलिब्रेशन करताना दिसतो. हार्दिकने हा व्हिडीओ पोस्ट करत बुमराहला विचारले आहे की, ‘कसा आहे फॉर्म... बूम?’ सोशल मीडियावर हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसत आहे. एका चाहत्यानेच उत्तर देताना लिहिले की, ‘चांगला; पण बुमराह शेवटी बुमराहच आहे.’

पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहची आशिया कपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघात निवड होऊ शकलेली नाही. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए)मध्ये दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.

येत्या ऑगस्टपासून दुबईत आशिया कपला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध असल्याने भारतीय संघ त्वरित तयारीला लागला आहे. दरम्यान, याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीही अनेकदा बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करताना दिसला आहे. हार्दिकने इन्स्टाग्रामवर केवळ त्याची बॉलिंग अ‍ॅक्शन कॉपी केली नाही तर त्याच्या सेलिब्रेशनचीही कॉपी केली आहे. बुमराहने इंग्लंड दौऱ्यापासून क्रिकेट खेळलेले नाही. त्यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेच्या दौऱ्यांमधूनही विश्रांती देण्यात आली. आशिया कपमधून बाहेर पडलेल्या बुमराहला टी-२० विश्वचषकात मात्र खेळण्याची दाट शक्यता आहे. कारण टी-२० विश्वचषकात बुमराहचा संघात समावेश भारतासाठी आवश्यक आहे.

काही दिवसांपूर्वी हार्दिक पत्नी नताशासोबत सुट्टी घालवून मुंबईत परतला होता. हार्दिक आशिया कप २०२२मध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. आयपीएलनंतर फलंदाजीसोबतच हार्दिकच्या गोलंदाजीतही सुधारणा झाली आहे. हार्दिक आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीने प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्यात निष्णात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in