श्रीलंका दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी हार्दिककडे नेतृत्व? एकदिवसीय मालिकेतून मात्र माघार

भारताचा टी-२० प्रकारात कायमस्वरूपी कर्णधार कोण असेल, याविषयी अद्याप चर्चा झालेली नाही. हार्दिकसह सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांची नावेही टी-२० प्रकारातील कर्णधारपदासाठी शर्यतीत...
श्रीलंका दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी हार्दिककडे नेतृत्व? एकदिवसीय मालिकेतून मात्र माघार
Published on

नवी दिल्ली : आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात येणार आहे. मात्र वैयक्तिक कारणास्तव हार्दिक या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. श्रीलंका दौऱ्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी २१ जुलैपर्यंत भारताचे संघ जाहीर करण्यात येतील.

टी-२० साठी कायमस्वरूपी कर्णधार कोण?

“टी-२० विश्वचषकात हार्दिक भारताचा उपकर्णधार होता. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून आगामी टी-२० मालिकेत त्याच्याकडेच भारताचे नेतृत्व सोपवण्यात येईल. मात्र वैयक्तिक कारणास्तव एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करू नये, अशी विनंती हार्दिकने केली आहे,” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भारताचा टी-२० प्रकारात कायमस्वरूपी कर्णधार कोण असेल, याविषयी अद्याप चर्चा झालेली नाही. हार्दिकसह सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांची नावेही टी-२० प्रकारातील कर्णधारपदासाठी शर्यतीत असल्याचे समजते.

रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा या त्रिकुटाने टी-२० विश्वचषक जेतेपदानंतर निवृत्ती पत्करली. त्यामुळे भारताला आता नव्याने टी-२० प्रकारात संघबांधणी करायची आहे. तसेच राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळही टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात आल्यामुळे आता गौतम गंभीरच्या प्रशिक्षण पर्वाला प्रारंभ होईल. २६ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात प्रत्येकी ३ टी-२० व ३ एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. मात्र भारतात सप्टेंबरपासून सुरू होणारा भरगच्च कार्यक्रम आणि वर्षाखेरीस होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेचा विचार करता रोहित, विराट, जसप्रीत बुमरा या प्रमुख खेळाडूंना एकदिवसीय मालिकेसाठीही विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

भारत-श्रीलंका यांच्यात २६, २७ व २९ जुलै रोजी पालेकेले येथे टी-२०, तर १, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. टी-२० सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७, तर एकदिवसीय सामने दुपारी २.३० वाजता सुरू होतील. २०२१नंतर प्रथमच भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध मायदेशातच २ कसोटी व ३ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी खेळून भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जाईल. तेथूनच मग नोव्हेंबरच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे.

भारताचा श्रीलंका दौरा

पहिला टी-२० सामना, शुक्रवार, २६ जुलै

दुसरा टी-२० सामना, शनिवार, २७ जुलै

तिसरा टी-२० सामना, सोमवार, २९ जुलै

पहिला एकदिवसीय, गुरुवार, १ ऑगस्ट

दुसरा एकदिवसीय, रविवार, ४ ऑगस्ट

तिसरा एकदिवसीय, बुधवार, ७ ऑगस्ट

logo
marathi.freepressjournal.in