

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आजपासून (दि.९) सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून जवळपास अडीच महिन्यांनी संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी, भारतीय संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांनी हार्दिक पांड्याचे भरभरुन कौतुक केले आहे. भारतीय टी-२० संघात हार्दिक पांड्यासारखा कोणताही खेळाडू नाही, कारण हा स्टार अष्टपैलू खेळाडू फलंदाजी असो वा गोलंदाजी कशाचाही बळावर संघात स्थान मिळवण्यास सक्षम आहे, असे त्यांनी म्हटले.
भारतीय संघात हार्दिक पांड्यासारखा दुसरा खेळाडू नाही...
जिओस्टारवरील 'फॉलो द ब्ल्यूज' कार्यक्रमात बोलताना संजय बांगर म्हणाले की, "सध्या जगातील सर्व अष्टपैलू खेळांडूकडे बघा, इंग्लंडकडे बेन स्टोक्सचा पर्याय आहे का? नाही. वन-डे किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाचा पर्याय नाही. हार्दिक पांड्यासोबतही असंच आहे. फक्त फलंदाजीच्या जोरावर तो पहिल्या पाच फलंदाजामध्ये स्थान मिळवू शकतो आणि जर तो फक्त गोलंदाज असता, तर तो कोणत्याही संघात आघाडीच्या तीन वेगवान गोलंदाजांपैकी एक असू शकतो. अशा प्रकारचा अष्टपैलू खेळाडू बनण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फलंदाजी किंवा गोलंदाजीच्या जोरावर संघात स्थान मिळवता आले पाहिजे. भारतीय संघात हार्दिक पांड्यासारखा दुसरा खेळाडू नाही.”
हार्दिकच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बोलताना बांगर म्हणाले की, "विश्वचषकापूर्वी हार्दिकने सहा किंवा सात टी-२० सामने खेळावेत की नाही हे सांगणे खूप लवकर होईल. पण, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध किमान पहिले तीन सामने खेळले पाहिजेत. तो परिस्थितीशी कसा जुळवून घेतो ते आपल्याला पाहावे लागेल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खूप फरक आहे. संघ व्यवस्थापनाने पांड्यासारख्या महत्त्वाच्या खेळाडूंवरील जबाबदारीचे व्यवस्थापन केले पाहिजे. हार्दिकसारखा खेळाडू जेव्हा पूर्णपणे तंदुरुस्त असतो तेव्हा संघाला परिस्थितीप्रमाणे बदल करण्याची संधी मिळते. यासाठी संघात त्याची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे."
हार्दिक पुनरागमनासाठी सज्ज
३२ वर्षीय अष्टपैलू हार्दिक पांड्या अडीच महिन्यांनी भारतीय संघात परतणार आहे. हार्दिक सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत जायबंदी झाला होता. बंगळुरू येथे हार्दिकने तंदुरुस्ती सिद्ध केली. मग मुश्ताक अली स्पर्धेत पंजाबविरुद्ध ४२ चेंडूंत नाबाद ७७ धावा फटकावून बडोद्याला २०० धावांचे लक्ष्य पार करून दिले आणि फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर आता तो संघात पुनरागमनासाठी सज्ज आहे.