दुबई : भारताचा तारांकित खेळाडू हार्दिक पंड्याने जागतिक टी-२० अष्टपैलू क्रमवारीत पुन्हा एकदा अग्रस्थान काबिज केले आहे. तसेच फलंदाजांमध्ये तिलक वर्माने जोरदार मुसंडी मारताना थेट तिसरे स्थान मिळवले आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. या मालिकेत तिलकने दोन शतके झळकावताना मालिकावीर पुरस्कारही पटकावला. त्यामुळे ७२व्या स्थानी असलेल्या तिलकने थेट तिसरा क्रमांक मिळवला आहे. कारकीर्दीत प्रथमच २२ वर्षीय तिलकने अव्वल १० खेळाडूंत स्थान मिळवले असून सध्या त्याच्या खात्यात ८०६ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड (८५५) व इंग्लंडचा फिल सॉल्ट (८२८) हे दोघे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. सूर्यकुमारची एका स्थानाने घसरण झाली असून तो ७८८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसनने १७ स्थानांनी झेप घेत २२वा क्रमांक मिळवला आहे.
गोलंदाजांमध्ये भारताचा लेगस्पिनर रवी बिश्नोई ६६६ गुणांसह आठव्या, तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ६५६ गुणांसह नवव्या स्थानी आहे. अर्शदीपने तीन स्थानांनी आगेकूच केली, तर बिश्नोईची एका स्थानाने घसरण झाली. इंग्लंडचा आदिल रशिद या यादीत अग्रस्थानी आहे.
अष्टपैलूंचा विचार करता हार्दिक २४४ गुणांसह पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी जुलैमध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावल्यावर हार्दिक अग्रस्थानी विराजमान झाला होता. ३१ वर्षीय हार्दिकने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू योगदान दिले. नेपाळचा दिपेंद्र सिंग दुसऱ्या, तर लियाम लिव्हिंगस्टोन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, हार्दिकने बीसीसीआयला सय्यद मुश्ताक अली या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत खेळण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे रणजी स्पर्धेतील पाचवा सामना झाल्यानंतर सुरू होणाऱ्या मुश्ताक अली स्पर्धेत हार्दिक बडोदा संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याचा भाऊ कृणाल पंड्या या संघाचे नेतृत्व करत आहे. यंदा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येत आहे.