नवी मुंबई : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या अखेर पायाच्या दुखापतीतून सावरत चार महिन्यांनी मैदानात परतला आहे.
नवी मुंबई येथे सुरू झालेल्या डी. वाय. पाटील टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेत हार्दिकने गोलंदाजी करताना २२ धावांत २ बळी मिळवले. त्यामुळे रिलायन्स वन्स संघाने भारत पेट्रोलियम संघावर २ गडी राखून मात केली. फलंदाजीत मात्र तो १०व्या क्रमांकावर आला. त्याने ४ चेंडूंत नाबाद ३ धावा केल्या. विश्वचषकात ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या लढतीत हार्दिकच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. आगामी आयपीएलमध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार असून या स्पर्धेद्वारे तो पुन्हा लय मिळवण्यास उत्सुक आहे. इशान किशनसुद्धा या स्पर्धेत सहभागी झाला असून मंगळवारी तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून खेळताना दिसेल. तसेच श्रेयस अय्यरही या स्पर्धेत खेळणार असल्याचे समजते.