Commonwealth Games 2026 : हरजिंदरने रौप्य जिंकले

भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ६९ किलो वजनी गटात दोन नवे विक्रम नोंदवत रौप्यपदक पटकावले.
Commonwealth Games 2026 : हरजिंदरने रौप्य जिंकले
Commonwealth Games 2026 : हरजिंदरने रौप्य जिंकले(Photo -X/@India_AllSports)
Published on

ग्लासगो : भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ६९ किलो वजनी गटात दोन नवे विक्रम नोंदवत रौप्यपदक पटकावले. या कामगिरीसह भारताने या स्पर्धेत वेटलिफ्टिंगमधील सातवे पदक निश्चित केले आहे.

२९ वर्षीय हरजिंदरने स्नॅच तसेच क्लीन अँड जर्क या दोन्ही प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेतील नवीन विक्रम प्रस्थापित करताना वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. यापूर्वी २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत तिने ७१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते. पंजाबमधील नाभा येथील रहिवासी असलेल्या हरजिंदरने स्नॅच प्रकारात सर्व तीन प्रयत्न यशस्वी केले. तिने ९६ किलो वजनापासून सुरुवात करत अनुक्रमे ९९ किलो आणि १०१ किलो वजन यशस्वीपणे उचलले. तिच्या शेवटच्या दोन प्रयत्नांनी स्पर्धेचा नवा विक्रम रचला. यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारात तिने १२० किलोने सुरुवात केली आणि त्यानंतर १२३ किलो व १२६ किलो वजन उचलून पुन्हा विक्रम मोडीत काढला. तिची एकूण २२७ किलो वजनाची उचल ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि यामुळे तिला रौप्यपदक मिळवणे सोपे झाले.

या स्पर्धेत कॅनडाच्या २० वर्षीय शार्लोट सिमोनेऊने सुवर्णपदक पटकावले. सिमोनेऊने स्नॅचमध्ये १०८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १३२ किलो असे एकूण २४० किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेचे सर्व नवीन विक्रम रचले. तिने भारतीय खेळाडूवर १३ किलोची स्पष्ट आघाडी घेतली. सिमोनेऊने स्नॅचमध्ये १०४ किलोने सुरुवात करत १०८ किलोचा टप्पा गाठला. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये तिने थेट १२७ किलोने सुरुवात केली आणि १३२ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर मोहर उमटवली.

हरजिंदरच्या या रौप्यपदकामुळे भारताची वेटलिफ्टिंगमधील कामगिरी अधिक मजबूत झाली आहे. भारतीय वेटलिफ्टर्सनी या स्पर्धेत आतापर्यंत एकूण सात पदकांची कमाई केली असून त्यात एक सुवर्ण, पाच रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे, हे विशेष.

संजनाची निराशा

१९ वर्षीय वेटलिफ्टर संजना हिचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ७७ किलो वजनी गटातील आव्हान बुधवारी संपुष्टात आले. स्नॅच प्रकारातील तिन्ही प्रयत्न अपयशी ठरल्याने तिला स्पर्धेतून लवकर बाहेर पडावे लागले. संजनाला स्नॅच प्रकारात ९४ किलोचे प्रारंभिक वजन पेलता आले नाही. सलग तीन प्रयत्नांत अपयश आल्याने क्लीन अँड जर्क फेरीपूर्वीच तिची मोहीम संपली. स्नॅचमध्ये एकही यशस्वी प्रयत्न न झाल्याने ती स्पर्धेतून बाद झाली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in