ICC विजयाची प्रतीक्षा संपुष्टात आणणार; कॅप्टन हरमनप्रीतला विश्वास; मायदेशातील महिला वनडे वर्ल्डकपसाठी उरले फक्त ५० दिवस

ICC Women’s World Cup 2025 : भारतीय महिला संघाला अद्याप क्रिकेटमध्ये एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र यंदा घरच्या मैदानात आपल्याच प्रेक्षकांसमोर खेळताना आम्ही ही प्रतीक्षा संपुष्टात आणू, असा विश्वास भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला.
ICC विजयाची प्रतीक्षा संपुष्टात आणणार; कॅप्टन हरमनप्रीतला विश्वास; मायदेशातील महिला वनडे वर्ल्डकपसाठी उरले फक्त ५० दिवस
Photo : X (@JayShah)
Published on

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई

भारतीय महिला संघाला अद्याप क्रिकेटमध्ये एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र यंदा घरच्या मैदानात आपल्याच प्रेक्षकांसमोर खेळताना आम्ही ही प्रतीक्षा संपुष्टात आणू, असा विश्वास भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला.

भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे (५० षटकांचा) आयोजन करणार आहेत. या विश्वचषकासाठी आता फक्त ५० दिवस शिल्लक असून त्या निमित्ताने सोमवारी मुंबईत झालेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत हरमनप्रीतने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना, मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज यादेखील उपस्थित होत्या. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते यावेळी दीपप्रज्वलन करून विश्वचषकाचे अनावरण करण्यात आले. बीसीसीआयचे सचिव देवाजीत साइकिया, आयसीसीचे सीईओ संजोग शर्मा यावेळी मंचावर होते. तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग व मिताली राज यांनीदेखील यावेळी हजेरी लावून महिला संघाला शुभेच्छा दिल्या.

आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. त्यांपैकी भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. मात्र यावेळी हरमनप्रीतच्या नेतृत्वात महिला संघ जेतेपद मिळवेल, अशी आशा आहे.

भारत चौथ्यांदा महिलांच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी १९७८, १९९७ व २०१३मध्ये भारतात महिलांचा एकदिवसीय विश्वचषक रंगला होता. भारताने आजवर टी-२० किंवा एकदिवसीय प्रकारात एकदाही विश्वचषक उंचावलेला नसल्याने यावेळी घरच्या प्रेक्षकांसमोर नक्कीच ते ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्यास आतुर असतील. मात्र ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ त्यांच्या मार्गात अडथळा ठरू शकतात.

“घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषकात खेळणे नक्कीच खास असेल. २०१३मध्ये जेव्हा भारतात एकदिवसीय विश्वचषक झाला होता, तेव्हा मी युवा खेळाडू होते. यंदा कर्णधार व संघातील अनुभवी खेळाडू म्हणून हे क्षण जगण्यास आतुर आहे. यावेळी आम्ही पराभवाचे चक्रव्यूह भेदून विश्वचषक जिंकून दाखवू. संपूर्ण देशाला विश्वचषकाची भेट देण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू,” असे हरमनप्रीत म्हणाली.

भारताने नुकतीच इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत धूळ चारली. त्यानंतर विश्वचषकापूर्वी भारतीय संघ सप्टेंबरमध्ये १४ तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. “विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्याचा आम्हाला लाभ होईल. आम्ही सरावात विशेष मेहनत घेत असून प्रत्येक खेळाडूला आपल्यावरील जबाबदारीची जाणीव आहे. संघाचा मेळ उत्तम साधला गेला आहे. त्यामुळे पुढील २-३ महिने आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू, याची खात्री आहे,” असेही हरमनप्रीतने सांगितले.

स्मृतीने यावेळी २०१७च्या विश्वचषकातील आठवणींना उजाळा दिला. तसेच संघातील युवा खेळाडू हे फारसे दडपण बाळगत नाहीत, असे ती म्हणाली. तर मुंबईकर जेमिमाने २०१७च्या विश्वचषकातील अंतिम फेरीच्या पराभवानंतरही भारतीय संघाला मुंबई विमानतळावर आणण्यासाठी गेली असता, कशाप्रकारे चाहत्यांचे प्रेम पाहून ती भारावून गेली व तिला प्रेरणा मिळाली, याचा खुलासा केला. या विश्वचषकानंतरच जेमिमाचे भारतीय संघात पदार्पण झाले.

एकूणच आता एकीकडे ऑगस्ट महिन्यात क्रिकेटचा ज्वर कमी झालेला असताना सप्टेंबरपासून पुरुषांचा आशिया चषक व महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या निमित्ताने क्रीडाप्रेमींचे पुन्हा मनोरंजन होणार आहे. त्यामुळे सर्वांना सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा आहे.

समाज माध्यमांपासून शक्यतो दूर रहा ; युवराज, मितालीचा सल्ला

भारताचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंगने भारतीय महिलांना शुभेच्छा देतानाच मोलाचा सल्लाही दिला. “२०११च्या विश्वचषकात आम्ही आफ्रिकेविरुद्ध एक लढत गमावली. त्यावेळी सुदैवाने समाज माध्यमे (सोशल मीडिया) इतकी नव्हती. मात्र तरीही वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांद्वारे आमच्यावर टीका करण्यात आली. तेथून आमच्या विश्वचषक अभियानाला एकप्रकारे कलाटणी मिळाली. आमच्यापैकी सर्वांनीच त्यानंतर बाहेरच्या विश्वाशी संपर्क तोडला होता. आमचे लक्ष फक्त विश्वचषक जिंकण्यावर होता. सध्या माध्यमांचा प्रभाव फार वाढला असून तुम्हाला यावर नियंत्रण राखणे गरजेचे आहे,” असे युवराज म्हणाला.

“२०१७चा विश्वचषक भारतातील महिला क्रिकेटचे रूप पालटणारा ठरला. आता महिला क्रिकेटपटूंनाही पुरुषांच्या बरोबरीने मानधन मिळत आहे. सर्व प्रकारांत आपला संघ चांगली कामगिरी करत असून त्या आयसीसी जेतेपदाचीच प्रतीक्षा आहे. त्यामुळे यावेळी आपला संघ नक्कीच जिंकेल, अशी आशा आहे,” असे माजी कर्णधार मिताली राज म्हणाली. २००५ व २०१७ मध्ये मितालीच्याच नेतृत्वात भारताने अंतिम फेरी गाठली होती.

भारतीय महिलांचे साखळी सामने

  • ३० सप्टेंबर वि. श्रीलंका

  • ५ ऑक्टोबर वि. पाकिस्तान

  • ९ ऑक्टोबर वि. दक्षिण आफ्रिका

  • १२ ऑक्टोबर वि. ऑस्ट्रेलिया

  • १९ ऑक्टोबर वि. इंग्लंड

  • २३ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड

  • २६ ऑक्टोबर वि. बांगलादेश

(सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील.)

‘ती’ १७१ धावांची खेळी निर्णायक!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१७च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत साकारलेली नाबाद १७१ धावांची खेळी आपल्यासाठी नेहमीच खास असेल, असे हरमनप्रीतने सांगितले. तसेच उपकर्णधार स्मृतीनेसुद्धा त्या शतकाचा संघाच्या मानसिकतेवर कसा सकारात्मक परिणाम झाला, याविषयी सांगितले.

पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत

आयसीसीशी झालेल्या करारानुसार पाकिस्तानचा संघ या विश्वचषकासाठी भारतात येणार नाही. त्यामुळे त्यांचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथे होतील. भारत-पाकिस्तान यांच्यात ५ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठीसुद्धा भारतीय संघ कोलंबोला जाणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे भारताने मार्च महिन्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत झाले. आयसीसीने २०२७च्या सर्व स्पर्धांपर्यंत दोन्ही संघांत करार केला आहे. त्यानुसार भारतात एखादी आयसीसी स्पर्धा असली, तर पाकिस्तान अन्य ठिकाणी खेळणार. तसेच पाकिस्तानमधील आयसीसी स्पर्धेसाठी भारत जाणार नाही. महिला विश्वचषकात पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर ती लढत कोलंबोत होईल. अन्यथा गुवाहाटीत खेळवण्यात येईल. अंतिम फेरीसाठीसुद्धा बंगळुरू व कोलंबो असे दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत.

विश्वचषकाचे स्वरूप कसे?

  • ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात ८ संघांत महिलांचा विश्वचषक रंगणार आहे. एकंदर हा १३वा महिला विश्वचषक असेल. १९७३पासून महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे दर चार वर्षांनी आयोजन करण्यात येत आहे.

  • यंदा साखळी फेरीत प्रत्येक संघ सात सामने खेळणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व न्यूझीलंड हे आठ संघ स्पर्धेत सहभागी होतील.

  • साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेतील आघाडीचे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. २ नोव्हेंबरला विजेता ठरेल. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ७, इंग्लंडने ४, तर न्यूझीलंडने एकदा महिला विश्वचषक जिंकला आहे.

गेल्या काही वर्षांत देशातील महिला क्रिकेट संघाने उत्तम कामगिरी केली आहे. भारताला असंख्य प्रतिभावान खेळाडू गवसले आहेत. यावरूनच देशाचीसुद्धा प्रगती होत असल्याचे समोर येते. यंदाचा विश्वचषक भारतातील महिला क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा असून याद्वारे देशातील युवतींना प्रेरणा मिळेल. त्यामुळे या विश्वचषकाची उत्सुकता लागून आहे.

संजोग शर्मा, आयसीसीचे सीईओ

भारतात आयसीसी विश्वचषकाचे पुनरागमन होत असल्याने मी आनंदी आहे. येथील चाहते क्रिकेटसाठी नेहमीच तयार असतात. तसेच या विश्वचषकामुळे भारतात महिला क्रिकेटला एक नवी चालना मिळेल. आता फक्त ५० दिवस शिल्लक असताना पुढील २ महिन्यांत अवघ्या भारतात विश्वचषकाचा ज्वर वाढलेला दिसून येईल.

जय शहा, आयसीसीचे अध्यक्ष

logo
marathi.freepressjournal.in