
नवी दिल्ली: संघातील युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या समन्वयाचा, संतुलित संघाचा फायदा भारतीय महिला संघाला पहिल्यावहिल्या महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी उपयोगी पडेल, असा विश्वास भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला.
भारतीय संघाने या स्पर्धेसाठी चांगली तयारी केली आहे. भारतीय महिला संघाने प्रथमच इंग्लंडविरुद्ध परदेशात टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे. त्यासह मायदेशात ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत विजयासाठी झुंजवले. ही मालिका भारताने १-२ अशी गमावली.
भारतीय संघात युवा आणि अनुभवी असा समन्वय आहे. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, हर्लिन देओल, प्रतीका रावल, रिचा घोष आणि उमा छेत्री अशी दर्जेदार फलंदाजांची फळी भारताच्या ताफ्यात आहे, असे हरमनप्रीतने आयसीसीसाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.
गोलंदाजी विभागही तितकाच प्रभावी आहे. रेणुका ठाकूर आणि अरुंधती रेड्डी यांच्यासह युवा गोलंदाज क्रांती गौड, श्री चरणी आणि राधा यादव यांचा संघात समावेश आहे. दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि अमनजोत कौर या तीन अष्टपैलू खेळाडूही संघात आहेत. भारताला विजय मिळवून देण्याची ताकद त्यांच्या खेळात आहे, असे हरमनप्रीत म्हणाली.
आमच्याकडे एक संतुलित संघ आहे. स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची तयारी झाली आहे. त्यामुळे हा विश्वचषक आम्हीच जिंकू असा विश्वास हरमनप्रीतने व्यक्त केला.
स्पर्धा मोठी आहे. शिवाय सात वेळा विजेतेपद पटकावलेला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारखे तगडे संघ सहभागी झालेले आहेत. पण भारतीय संघाला स्वतःच्या क्षमतेवर आणि तयारीवर पूर्ण विश्वास असल्याचे हरमनप्रीत म्हणाली.
अलिकडच्या मायदेशातील आणि परदेशातील मालिकांत भारताने शानदार कामगिरी केली आहे. ही बाब भारतीय महिला संघासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे त्याच लयीत विश्वचषक स्पर्धेत उतरत असल्याचे हरमनप्रीत म्हणाली.
गेल्या वर्षभरातील भारतीय महिला संघाची कामगिरी चांगलीच राहिली आहे. त्यामुळे यंदा या संघाने विश्वचषक जिंकावे अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. आगामी महिला विश्वचषक स्पधेचे यजमानपद श्रीलंका आणि भारताकडे आहे. मायदेशात होणाऱ्या या स्पर्धांचा फायदा भारताला होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. भारतीय महिला संघही सध्या चांगलाच लयीत आहे.
मंगळवारपासून महिला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात
आयसीसीच्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद श्रीलंका आणि भारताकडे आहे. चौथ्यांदा भारत या स्पर्धेचे आयोजन करत आहे. मंगळवारपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. गेल्या दोन स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विजेतेपदाच्या चषकाने हुलकावणी दिली आहे. २०१७ मध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखाली लॉईड्सवरच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध थरारक पराभव स्वीकारावा लागला होता.