पॅरिस : कर्णधार हरमनप्रीत सिंगने त्याला भारताचा सर्वोत्तम ड्रॅगफ्लिकर म्हणून का ओळखले जाते, हे सोमवारी पुन्हा सिद्ध केले. शेवटच्या दीड मिनिटांत हरमनप्रीतने नोंदवलेल्या निर्णायक गोलमुळे भारतीय हॉकी संघाने ब-गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखले. आता मंगळवारी भारताची आयर्लंडशी गाठ पडेल.
जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर अर्जेंटिना सातव्या स्थानी आहे. मात्र दोन्ही संघांमध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. लुकास मार्टिनेझने २२व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर ५९व्या मिनिटापर्यंत भारताला बरोबरी साधता आली नव्हती. यादरम्यान भारताने तब्बल ९ वेळा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली. त्यापैकी तीन वेळा हरमनप्रीतलाच अपयश आले.
मात्र न्यूझीलंडविरुद्धसुद्धा अखेरच्या वेळी गोल करणारा हरमनप्रीत यावेळी पुन्हा संघासाठी धावून आला. त्याने ५९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये सुरेख रुपांतर करताना भारताला बरोबरी साधून दिली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला नमवल्यामुळे भारताच्या खात्यात सध्या २ सामन्यांत १ विजय व १ बरोबरीचे ४ गुण असून ते ब-गटात तिसऱ्या स्थानावर आहेत. अर्जेंटिनाला सलामीला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते चौथ्या स्थानी आहेत. ३६व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली होती. मात्र मैको कासेलाला याचे गोलमध्ये रूपांतर करता न आल्याचा अर्जेटिनाला फटका बसला.
होकी
"आम्ही खराब खेळ केला, असे म्हणता येणार नाही. अर्जेटिनाचा बचाव भेदणे खरंच कठीण होते. मला संघाच्या कामगिरीचा अभिमान आहे. पेनल्टी कॉर्नरवर गोला करण्याचे विविध पर्याय आम्हाला शोधावे लागतील," असे हरमनप्रीता भारताच्या विजयानंतर म्हणाला- हॉकीमध्ये १२ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून गटातील आघाडीचे ४ संघा उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
भारतीय संघ ब-गटात ४ गुणांसह तिसऱ्या
स्थानी आहे. बेल्जियम व ऑस्ट्रेलिया यांनी आपापले पहिले दोन्ही सामने जिंकून ६ गुणांसह पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारताची १ व २ ऑगस्ट रोजी अनुक्रमे बेल्जियम व ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे.