हरमनप्रीतचा हल्लाबोल; भारतीय महिला संघाचा इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिकाविजय

भारताने दिलेल्या ३३४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ४४.२ षटकांत २४५ धावांवर आटोपला
हरमनप्रीतचा हल्लाबोल; भारतीय महिला संघाचा इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिकाविजय

कँटरबरी येथील सेंट लॉरेन्स ग्राऊंडवर गुरुवारी हरमनप्रीत कौरचे वादळ घोंघावले. कर्णधार हरमनप्रीत कौरने (१११ चेंडूंत १४३ धावा) साकारलेल्या घणाघाती शतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडला ८८ धावांनी धूळ चारली. सलग दुसऱ्या विजयासह भारताने २३ वर्षांनी प्रथमच इंग्लंडच्या भूमीत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

भारताने दिलेल्या ३३४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ४४.२ षटकांत २४५ धावांवर आटोपला. भारताने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. उभय संघांतील तिसरी लढत शनिवारी लॉर्ड्सवर खेळवण्यात येईल. यापूर्वी, १९९९मध्ये अंजुम चोप्राच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडवर २-१ अशी मात करून मालिका जिंकली होती. त्यानंतर हरमनप्रीतच्या संघाने अशी किमया साधली आहे.

प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीतने तब्बल १८ चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. १२व्या षटकात फलंदाजीला आलेल्या हरमनप्रीतने अखेरपर्यंत नाबाद राहून भारताला ५० षटकांत ५ बाद ३३३ अशी मोठी धावसंख्या उभारून दिली. तिने हरलीन देओलसह (५८) चौथ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना रेणुका सिंगने ५७ धावांत चार बळी पटकावून इंग्लंडच्या फलंदाजांना वेसण घातले. डॅनी व्हॅट (६५), एलिस कॅप्से (३९) आणि अॅमी जोन्स (३९) यांनी इंग्लंडकडून कडवी झुंज दिली. परंतु त्यांना इंग्लंडचा पराभव टाळता आला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in