पॅरिस : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या महाकुंभात भारताच्या हरविंदर सिंगने तो तिरंदाजीत किंग असल्याचे दाखवून दिले. हरविंदरने पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी तिरंदाजीतील पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
३३ वर्षीय हरविंदरने पुरुष एकेरीच्या रिकर्व्ह प्रकारातील अंतिम फेरीत पोलंडच्या लुकास सिझेकला ६-० अशी धूळ चारली. हरयाणाच्या हरविंदरने २०२०च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये याच प्रकारात कांस्यपदक पटकावले होते. मात्र यावेळी त्याने पदकाचा रंग सोनेरी करताना एकूण २८-२४, २८-२७, २९-२५ अशी गुणसंख्या नोंदवली. मुख्य म्हणजे एकाच दिवसात सलग पाच सामने (राऊंड ऑफ ३२ पासून ते अंतिम फेरी) जिंकून हरविंदरने सुवर्ण काबिज केले.
हरविंदरने अर्थशास्त्रामध्ये पदवीसुद्धा मिळवलेली असून त्याच्या या यशामुळे भारताची यंदाच्या पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदकांची संख्या पाचपर्यंत वाढली आहे. तसेच तिरंदाजीतील भारताचे हे यंदाचे दुसरे पदक ठरले. काही दिवसांपूर्वी शीतल देवी आणि राकेश कुमार यांच्या जोडीने मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.
हरविंदरने राऊंड ऑफ ३२ फेरीत हेक्टर जुलिओला ६-२ असे, तर राऊंड ऑफ १६ फेरीत इंडोनेशियाच्या सेटिवानला ६-२ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत हरविंदरने जागतिक सुवर्णपदक विजेत्या इराणच्या मोहम्मद अमेरीवर ७-३ असे वर्चस्व गाजवले. अखेर अंतिम फेरीतही त्याने धडाका कायम राखला व एकही सेट न गमावता सुवर्ण लक्ष्य साधले. रिकर्व्ह प्रकारात ७० मीटर अंतरावरून खेळाडू समोरील बोर्डवर लक्ष्य साधतात.
ऑगस्टमध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या तिरंदाजांनी निराशा केली होती. मात्र पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजांनी अफलातून कामगिरी करताना आतापर्यंत दोन पदके जिंकली आहेत. हरविंदर पूजा जत्यानच्या साथीने मिश्र सांघिक प्रकारातही सहभागी झाला असून त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
हरविंदरचा संघर्ष
अवघ्या दोन वर्षांचा असताना हरविंदरला डेंग्यू झाला. त्यावेळी चुकीच्या औषधोपचांरामुळे हरविंदरला पायाच्या भागात अपंगत्व आले.
२०१२मध्ये लंडन पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजी पाहिल्यावर त्याने या खेळाकडे वळण्याचा निर्णय घेतला. सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये त्याने पदक जिंकण्याचा मान मिळवला आहे.
पदकतालिकेत सध्या १३व्या स्थानी असलेल्या भारताच्या खात्यात २५ पदके जमा आहेत. यामध्ये ५ सुवर्ण, ९ रौप्य व ११ कांस्यपदकांचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मी सरावात सातत्याने १० गुणांचा वेध घेत होतो. त्यामुळे यावेळी पदकाचा रंग सोनेरी करेन, याची खात्री होती. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे मी इथवर मजल मारली आहे.
- हरविंदर सिंग