मुंबई : यष्टिरक्षक तसेच सलामीवीर हार्दिक तामोरेने (२३३ चेंडूंत ११४ धावा) अखेर मिळालेल्या संधीचा लाभ उचलत संयमी शतक साकारले. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात तब्बल ४१५ धावांची आघाडी घेतली आहे.
बीकेसी येथे सुरू असलेल्या या लढतीच्या चौथ्या दिवसअखेर मुंबईने दुसऱ्या डावात ९ बाद ३७९ धावा केल्या आहेत. मंगळवारी सामन्याचा अखेरचा दिवस असल्याने मुंबई बडोद्याला कधी फलंदाजीसाठी आमंत्रित करणार, हे पाहणे रंजक ठरेल. तनुष कोटियन ३२, तर तुषार देशपांडे २३ धावांवर नाबाद खेळत आहे.
रविवारच्या १ बाद २१ धावांवरून पुढे खेळताना हार्दिकने १० चौकारांसह हंगामातील पहिले शतक साकारले. पृथ्वी शॉनेसुद्धा १० चौकार व २ षटकारांसह ९३ चेंडूंत ८७ धावा फटकावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे (०) अपयशी ठरला. मात्र शम्स मुलाणीने ५४ धावांचे योगदान दिले. डावखुरा फिरकीपटू भार्गव भट्टने तब्बल ७ गडी बाद केले आहेत. मुंबईने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. सामना अनिर्णित राहिल्यास मुंबई उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. आतापर्यंत तामिळनाडू व मध्य प्रदेश यांनी उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले आहे.