क्लासेनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; मॅक्सवेल एकदिवसीय प्रकारातून निवृत्त

दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज हेनरिच क्लासेनने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धक्कादायकरित्या निवृत्ती जाहीर केली. तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला.
क्लासेनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; मॅक्सवेल एकदिवसीय प्रकारातून निवृत्त
Published on

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज हेनरिच क्लासेनने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धक्कादायकरित्या निवृत्ती जाहीर केली. तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला.

३३ वर्षीय क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाठी ४ कसोटी, ६० एकदिवसीय व ५८ टी-२० सामने खेळले. विशेषत: एकदिवसीय व टी-२०मध्ये क्लासेनची फलंदाजी अधिक धोकादायी होती. २०२४च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताविरुद्ध त्याने जवळपास आफ्रिकेला विजय मिळवून दिला असता. एकदिवसीय प्रकारात क्लासेनने चौथ्या अथवा पाचव्या स्थानी फलंदाजी करताना ६० सामन्यांत ४ शतकांसह ४३च्या सरासरीने २,१४१ धावा केल्या. आता क्लासेन फक्त जगभरातील फ्रँचायझी टी-२० व टी-१० लीगमध्ये खेळताना दिसेल.

दुसरीकडे ३६ वर्षीय मॅक्सवेल आता फक्त ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघातून खेळताना दिसेल. १४९ एकदिवसीय सामन्यांत मॅक्सवेलने ३,९९० धावा करताना २३ अर्धशतके व ४ शतकांसह १२६च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध एक पाय जायबंदी असतानाही नाबाद २०१ धावांची ‘न भूतो, न भविष्यती’ अशी खेळी साकारली. आता २०२६च्या टी-२० विश्वचषकावर मॅक्सवेलच्या नजरा आहेत. मात्र या दोघांच्या निवृत्तीमुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे, हे निश्चित.

logo
marathi.freepressjournal.in