
जगिर (बिहार) : पुरुषांच्या आशिया चषकात भारतीय हॉकी संघाचा शनिवारी चीनविरुद्ध सामना होईल. फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी भारताला चीनविरुद्ध किमान बरोबरी पत्करणे गरजेचे आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ तूर्तास सुपर-फोर फेरीत ४ गुणांसह अग्रस्थानी आहे. साखळीत सलग तीन लढती जिंकणाऱ्या भारताने सुपर-फोर फेरीत दक्षिण कोरियाला बरोबरीत रोखले, तर मलेशियाला ४-१ अशी धूळ चारली. चीनने कोरियाला धूळ चारल्याने ते २ सामन्यांतील ३ गुणांसह (१ पराभव, १ विजय) दुसऱ्या स्थानी आहेत. चीनने भारताला नमवले, तर ते ६ गुणांसह अंतिम फेरी गाठतील. मात्र भारताने चीनला हरवले तर ७ गुणांसह, किंवा बरोबरीत रोखले तर ५ गुणांसहसुद्धा भारताचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल.
तिसऱ्या क्रमांकावरील मलेशिया (३ गुण) व कोरिया (१ गुण) यांच्यातही शनिवारी लढत होईल. भारताने चीनकडून पराभव पत्करला, तर मलेशिया व कोरिया लढत बरोबरीत सुटावी, यासाठी त्यांना प्रार्थना करावी लागेल. मात्र दोघांपैकी एकानेही विजय मिळवला, तरी भारताने चीनला बरोबरीत रोखणे गरजेचे आहे.
वेळ : सायंकाळी ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : सोनी टेन १