पॅरिसमध्येही चक दे इंडिया! सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक; श्रीजेशला थाटात निरोप देताना स्पेनवर २-१ अशी मात

भारताने तब्बल ५२ वर्षांनी प्रथमच सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली. तसेच भारतासाठी हे यंदाच्या ऑलिम्पिकमधील चौथे पदक ठरले.
पॅरिसमध्येही चक दे इंडिया! सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक; श्रीजेशला थाटात निरोप देताना स्पेनवर २-१ अशी मात
PTI
Published on

पॅरिस : भारतीय पुरुष हॉकी संघाने चार वर्षांपूर्वी टोकियोमध्ये ‘चक दे इंडिया’चा नारा देत ऐतिहासिक कांस्यपदकाला गवसणी घातली होती. २०२४मध्ये भारताच्या शिलेदारांनी पॅरिसमध्येही या कामगिरीची पुनरावृत्ती करताना कांस्यपदकावर मोहर उमटवली. द ग्रेट वॉल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला थाटात निरोप देताना भारताने कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनवर २-१ असे वर्चस्व गाजवले. भारताने तब्बल ५२ वर्षांनी प्रथमच सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली. तसेच भारतासाठी हे यंदाच्या ऑलिम्पिकमधील चौथे पदक ठरले.

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने टोकियोमध्ये जर्मनीला नमवून कांस्यपदक प्राप्त केले होते. यंदा हरमनप्रीतच्या सिंगच्या कर्णधारपदात भारताने सुवर्णस्वप्न उराशी बाळगले. मात्र त्यात अपयश आले असले तरी कांस्यपदकावर पुन्हा कब्जा करण्यात हा संघ यशस्वी ठरला. यापूर्वी १९६८ व १९८२च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने सलग दोन पदके पटकावली होती.

यंदा भारताने साखळीत दुसरे स्थान मिळवताना चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्यासह त्यांनी अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले. तसेच बेल्जियमकडून पराभव पत्करण्यापूर्वी त्यांना १-२ अशी झुंज दिली. उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये सरशी साधली. उपांत्य लढतीत मग जर्मनीकडून पराभव झाल्याने भारताचे १९८०नंतर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

मात्र गुरुवारी कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनवर कडव्या संघर्षानंतर मात केली. मार्क मिरेल्सने १८व्या मिनिटाला स्पेनचे खाते उघडताना पहिला गोल केला. मात्र कर्णधार हरमनप्रीत यावेळीही संघासाठी धावून आला. त्याने ३० आणि ३३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेल्या दोन गोलमुळे भारताने दुसऱ्या सत्रात २-१ अशी आघाडी घेतली. मग उर्वरित दोन सत्रात भक्कम बचाव आणि श्रीजेशच्या कौशल्यामुळे भारताने स्पेनला गोल करू दिला नाही. अखेरच्या ५ मिनिटांत त्याने दोनदा स्पेनचे प्रयत्न थोपवून धरले. अखेर पंचांनी शिटी वाजवताच भारताच्या पदकावर शिक्कामोर्तब झाले.

कारकीर्दीतून निवृत्त होण्यासाठी यापेक्षा सर्वोत्तम वेळ असू शकत नाही. देशात पदक जिंकून परतत असल्याचे समाधान निराळे आहे. हॉकी खेळाने मला ओळख दिली असून मी या खेळाचा आयुष्यभर ऋणी राहीन.

- पी. आर. श्रीजेश

> हरमनप्रीतने या स्पर्धेत सर्वाधिक १० गोल नोंदवले आहेत. २०२०च्या ऑलिम्पिकमध्येही हरमनप्रीतनेच भारताकडून सर्वाधिक ६ गोल केले होते.

> भारताचे हे हॉकीमधील एकंदर १३वे पदक ठरले. यामध्ये ८ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्यपदकांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in