

जालंधर : पाच वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. आघाडीपटू अभिषेक नैन याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने शुक्रवारी जपानचा ४-१ असा पराभव केला. या विजयासह भारताने पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
भारताने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा १३-० असा धुव्वा उडवला होता. त्यानंतर चीनवर ५-२ अशी मात केली होती. दुसरीकडे, जपानने दक्षिण कोरिया आणि बांगलादेशला अनुक्रमे ३-२ आणि १-० असे पराभूत केले होते. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या भारताने २०११, २०१६, २०१८, २०२३ आणि २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघातील बहुतांश खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, भारताकडून अभिषेकने ११व्या आणि ५१व्या मिनिटाला मैदानी गोल केले. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ४७व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या एकमेव पेनल्टी कॉर्नरवर अचूक फटका मारत गोल केला. विष्णुकांत सिंगने ५६व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जपानकडून शोता यामादाने १५व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर एकमेव गोल केला.
सामन्याच्या सुरुवातीला जपानने चेंडूवर अधिक नियंत्रण ठेवत भारतावर दबाव निर्माण केला. दुसऱ्याच मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र त्यावर गोल करण्यात अपयश आले. भारतीय मध्यफळी आणि आघाडीफळी यांच्यात सुरुवातीला समन्वयाचा अभाव दिसून आला. उपकर्णधार हार्दिक सिंगने खेळाची सूत्रे सांभाळण्याचा प्रयत्न केला.
११व्या मिनिटाला भारताने सुंदर चालीवर पहिला गोल केला. हार्दिकने सुखजीत सिंगकडे चेंडू सोपवला. सुखजीतने तो अभिषेककडे दिला आणि अभिषेकने कोणतीही चूक न करता चेंडू गोलजाळ्यात धाडला. अभिषेकचा हा १५०वा आंतरराष्ट्रीय सामना होता. पहिल्या सत्राच्या अखेरीस जपानला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. शोता यामादाने भारतीय गोलरक्षक सूरज कारकेराला चकवत गोल केला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही.
तिसऱ्या सत्रातही जपानने बचावात्मक खेळावर भर दिला. भारताला अनेक संधी निर्माण करण्यात अडचणी आल्या. मात्र, अखेरच्या सत्रात भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. ४७व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने जोरदार फटका मारत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ५१व्या मिनिटाला अभिषेकने सामन्यातील आपला दुसरा गोल केला. त्यामुळे भारताची आघाडी ३-१ झाली. अखेरच्या चार मिनिटांत कर्णधार हरमनप्रीतने दिलेल्या अचूक एरियल पासवर विष्णुकांतने गोल करत भारताचा विजय ४-१ असा निश्चित केला. भारताचा पुढील सामना रविवारी मलेशियाविरुद्ध होणार आहे.