

मोहाली : गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानचा ४-१ असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने स्पर्धेच्या इतिहासात सहाव्यांदा जेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला. गुरुवारी झालेल्या अंतिम लढतीत पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय खेळाडूंनी शानदार पुनरागमन करत प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ केले.
भारताने यापूर्वी २०११, २०१६, २०१८, २०२३ आणि २०२४ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. आता सलग तिसऱ्या विजेतेपदासह भारताने आशियाई हॉकीमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. अंतिम सामन्यात भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिसऱ्याच मिनिटाला जपानने काझुमासा मात्सुमोटोच्या मैदानी गोलच्या जोरावर आघाडी घेत भारतीय संघाला धक्का दिला. टोमहॉक शॉटच्या माध्यमातून मात्सुमोटोने गोल केला.
पहिल्या दोन सत्रांमध्ये जपानने भारताला चांगली झुंज दिली. भारतीय खेळाडूंनी काही चांगल्या संधी निर्माण केल्या; मात्र गोल करण्यात त्यांना यश आले नाही. २०व्या मिनिटाला जपानला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, भारतीय बचावफळीने कर्णधार रैकी फुजिशिमा याचे प्रयत्न हाणून पाडले. भारताचा उपकर्णधार हार्दिक सिंग याने आपल्या २००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मध्यफळीत उत्कृष्ट खेळ केला. बचाव आणि आक्रमण यांच्यातील समन्वय साधत त्याने संघासाठी अनेक संधी निर्माण केल्या. जर्मनप्रीत सिंहनेही बचावात उत्तम कामगिरी केली.
उत्तरार्धात पलटवार
पहिल्या सत्रात ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने मध्यंतरानंतर अधिक आक्रमक खेळ केला. ३३व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र कर्णधार हरमनप्रीत सिंहचा फटका जपानी गोलरक्षक किशो कुरोडा याने अडवला. ३९व्या मिनिटाला जपानला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण त्यांना गोल करता आला नाही. त्यानंतर भारताने आक्रमणाची धार वाढवली. ४२व्या मिनिटाला भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी दुसऱ्या प्रयत्नात आदित्य लालगे याच्या पासवर शिलानंद लाकराने रिबाऊंडवर गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
चार मिनिटांत तीन गोल
बरोबरीनंतर भारतीय संघाने जपानवर दबाव वाढवला. ४८व्या मिनिटाला हार्दिक सिंहच्या अप्रतिम पासवर दिलप्रीत सिंहने रिव्हर्स हिटद्वारे गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ५३व्या मिनिटाला भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर जुगराज सिंहने अचूक फटका मारत गोल केला आणि भारताची आघाडी ३-१ अशी केली. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात विवेक सागर प्रसादने चौथा गोल केला.
शेवटच्या क्षणी जपानला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र फुजिशिमाचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला. भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. एकूणच भारताने या स्पर्धेत सुरुवातीपासून शानदार खेळ केला.
प्रत्येकाला ३ लाख
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ मध्ये भारतीय पुरुष संघाच्या विजेतेपदाचा आनंद साजरा करताना, हॉकी इंडियाने या विजयाचे कौतुक म्हणून संघातील प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला १.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.