चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : विजयी चौकारासह भारत उपांत्य फेरीत

कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत मलेशियाचा ४-२ असा पराभव केला.
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : विजयी चौकारासह भारत उपांत्य फेरीत
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : विजयी चौकारासह भारत उपांत्य फेरीत(Photo-X/@India_AllSports)
Published on: 

जालंधर : कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत मलेशियाचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह पाच वेळच्या विजेत्या भारतीय संघाने स्पर्धेतील सलग चौथा विजय नोंदवला. सहा संघांच्या या स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित केले आहे.

हरमनप्रीतने सामन्यात तीन गोल करत आपली गोल करण्याची लय कायम राखली. त्याने तिसऱ्या, ३३व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल केले. यापैकी दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर, तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला. सुखजीत सिंगने ४३व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताच्या विजयात भर घातली. मलेशियाकडून अखिमुल्लाह अन्वर (२५वे मिनिट) आणि शेलो सिल्व्हेरियस (६०वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

हरमनप्रीतचा दणका

भारताने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरचे हरमनप्रीतने गोलमध्ये रूपांतर केले. त्याच्या ताकदवान ड्रॅग फ्लिकने मलेशियाचा गोलरक्षक हाफिजुद्दीन ओथमानला चकवले आणि भारताला १-० अशी आघाडी मिळाली. यानंतर भारतीय खेळाडूंनी मलेशियाच्या बचावफळीवर सातत्याने दबाव टाकला. मात्र, गोल करण्याच्या संधींचे रूपांतर करण्यात त्यांना यश आले नाही.

दुसऱ्या सत्रात मलेशियाने आक्रमणाचा वेग वाढवला. १८व्या मिनिटाला त्यांना सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यानंतर २४व्या मिनिटाला आणखी तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र, भारतीय बचावफळीने या सर्व संधी निष्फळ ठरवल्या. अखेर २५व्या मिनिटाला अखिमुल्लाह अन्वरने फेझ जालीच्या पासवर गोल करत मलेशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मध्यंतराला दोन्ही संघांची गोलसंख्या समान होती.

उत्तरार्धात आक्रमक खेळ

उत्तरार्धात भारतीय संघाने अधिक आक्रमक खेळ केला. ३३व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीतने पुन्हा एकदा अचूक ड्रॅग फ्लिक मारत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ४३व्या मिनिटाला सुखजीत सिंगने मैदानी गोल करत भारताची आघाडी ३-१ अशी केली. उपकर्णधार हार्दिक सिंगने मध्यफळीत चेंडूवर ताबा मिळवत सुंदर पास दिला. सुखजीतने टॉमहॉक फटक्याने चेंडू गोलजाळ्यात धाडला.

अखेरच्या क्षणी हरमनप्रीतची हॅट्ट्रिक पूर्ण

सामन्याची अंतिम शिट्टी वाजण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना भारताला सहावा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतचा गोलच्या दिशेने जाणारा फटका मलेशियन बचावपटूच्या शरीराला लागल्याने भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. हरमनप्रीतने कोणतीही चूक न करता गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. भारताने ४-१ अशी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला शेलो सिल्व्हेरियसने मैदानी गोल केला. आता सोमवारी भारताची दक्षिण कोरियाशी गाठ पडेल. भारताने सलग चार विजयांसह उपांत्य फेरी गाठलेली आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)