हॉकी संघाचा गोलरक्षक श्रीजेशची निवृत्तीची घोषणा

भारताच्या पुरुष हॉकी संघातील अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सोमवारी निवृत्तीची घोषणा केली. आगामी पॅरिस ऑलिम्पिक ही स्पर्धा कारकीर्दीतील अखेरची असेल, असे श्रीजेशने जाहीर केले.
हॉकी संघाचा गोलरक्षक श्रीजेशची निवृत्तीची घोषणा
PTI
Published on

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष हॉकी संघातील अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सोमवारी निवृत्तीची घोषणा केली. आगामी पॅरिस ऑलिम्पिक ही स्पर्धा कारकीर्दीतील अखेरची असेल, असे श्रीजेशने जाहीर केले. ३६ वर्षीय श्रीजेशच्या कारकीर्दीतील ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा असेल.

२०२०मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत श्रीजेशने मोक्याच्या क्षणी गोल अडवून जर्मनीविरुद्ध संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. श्रीजेशने भारतासाठी ३२८ सामने खेळताना तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. २०२२च्या राष्ट्रकुल रौप्यपदक आणि २०२३च्या आशियाई सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा श्रीजेश भाग होता. २००६मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेद्वारे पदार्पण करणारा श्रीजेश २०१४च्या आशियाई सुवर्ण तसेच २०१८च्या आशियाई कांस्यपदक विजेत्या संघाचाही सदस्य होता.

“पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची जर्सी अखेरदा परिधान करण्यासाठी आतुर आहे. गेल्या १८ वर्षांचा प्रवास हा संस्मरणीय आणि अभिमानास्पद होता. माझे कुटुंब, सहकारी, प्रशिक्षक, चाहते आणि भारतीय हॉकी महासंघाच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. यंदा ऑलिम्पिकपदे पदकाचा रंग बदलून थाटात मायदेशी परतू, इतकीच इच्छा आहे,” असे श्रीजेश म्हणाला. २०२१मध्ये श्रीजेशला प्रतिष्ठेच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच २०२१मध्येच भारताकडून विश्वातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणारा तो दुसराच खेळाडू ठरला होता.

logo
marathi.freepressjournal.in