२८ वर्षांनंतर प्रथमच विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतीय पंचांविना

आगामी एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत जवळपास तीन दशकांनंतर एकही भारतीय पंच किंवा तांत्रिक अधिकारी नसणार आहे.
२८ वर्षांनंतर प्रथमच विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतीय पंचांविना
(Photo-X/PTI)
Published on

नवी दिल्ली : आगामी एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत जवळपास तीन दशकांनंतर एकही भारतीय पंच किंवा तांत्रिक अधिकारी नसणार आहे. या प्रकारामुळे भारताच्या माजी आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांनी तीव्र निराशा व्यक्त केली असून, पंचांसाठी योग्य संरचित मार्ग उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.

येत्या १४ ऑगस्टपासून नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत १९९८च्या विश्वचषकानंतर प्रथमच एकही भारतीय पंच किंवा तांत्रिक अधिकारी दिसणार नाही. या स्पर्धेतील अधिकाऱ्यांच्या पॅनेलमध्ये युरोपीय देशांचेच वर्चस्व आहे. आधुनिक काळात भारताने केवळ चार पुरुष विश्वचषक पंच दिले आहेत, ज्यामध्ये अमरजित सिंह बावा (१९९०), तरलोक सिंह भुल्लर (१९९४), सतविंदर शर्मा (२००६, २०१०) आणि आर. व्ही. रघू प्रसाद (२०१०, २०१४, २०१८ आणि २०२३) यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी निवृत्त होण्यापूर्वी २०० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी करणारे पहिले आशियाई पंच ठरलेल्या रघू प्रसाद यांनी सांगितले की, “अव्वल दर्जाच्या स्पर्धांमधील सततच्या चांगल्या कामगिरीच्या आधारेच महत्त्वाच्या स्पर्धांसाठी नियुक्ती केली जाते.” एफआयएचची पंच समिती मागील विश्वचषक, ऑलिम्पिक आणि प्रो लीगमधील कामगिरीचे मूल्यमापन करून अधिकाऱ्यांची निवड करते. अनेक ऑलिम्पिक सामन्यांमध्ये पंचगिरी केलेले सतविंदर शर्मा यांनी भारतीय पंचांच्या अनुपस्थितीबद्दल निराशा व्यक्त केली. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी भारतीय पुरुष संघ पात्र ठरला नव्हता, तरीही मी एकमेव भारतीय प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होतो, असे सांगत त्यांनी पंचांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक संधी देण्याची मागणी केली.

आर्थिक सुरक्षिततेचा अभाव

१९९०च्या लाहोर विश्वचषक आणि १९८८ च्या सोल ऑलिम्पिकमध्ये पंचगिरी केलेल्या अमरजित सिंह बावा यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, पूर्वी पंचांना केवळ २० रुपये दैनिक भत्ता मिळायचा, जो के. पी. एस. गिल यांच्या काळात १०० रुपये झाला. रघू प्रसाद आणि शर्मा यांनी स्पष्ट केले की, पंचांच्या व्यवसायात अजूनही आर्थिक सुरक्षितता आणि चांगल्या पगाराचा अभाव आहे. खेळाडूंना पुरस्कार आणि सरकारी नोकऱ्या मिळतात, मात्र पंचांना वेतन किंवा योग्य प्रोत्साहन मिळत नाही, ज्यामुळे तरुण या क्षेत्राकडे वळत नाहीत. भारताकडे देशांतर्गत ५० हून अधिक पंचांचा संच असतानाही एफआयएच पॅनेलवर केवळ सहा पुरुष आणि चार महिला पंच आहेत, तर तांत्रिक अधिकाऱ्यांमध्ये केवळ चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या पंचांचा मुद्दा ऐरणीवर आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in