हाँगकाँग : भारताचा लक्ष्य सेनने चायनीज तैपईच्या चोऊ टिन चेनला सरळ सेटमध्ये पराभूत करून दोन वर्षांनंतर एका मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या दुहेरीत भारतीय जोडी सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली.
हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा शनिवारचा दिवस भारतासाठी विशेष ठरला. पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्यने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या आणि स्पर्धेत तिसरा मानांकीत चोऊ याला ५६ मिनिटांच्या सामन्यात २३-२१, २२-२० असे पराभूत केले.
कॉमनवेल्थ गेम्स विजेत्या भारताच्या लक्ष्यने जुलै २०२३ मध्ये कॅनडा ओपन ही अखेरची सुपर ५०० स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लखनऊ येथे झालेल्या सुपर ३०० स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी असलेल्या लक्ष्यसमोर अंतिम फेरीत चीनच्या ली शी फेंगचे आव्हान आहे.
पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारताच्या सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने चायनीज-तैपईच्या बिंग बोई लीन आणि चेन चंग कुआन या जोडीचा २१-१७, २१-१५ असा पराभव करत यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला. हंगामात आतापर्यंत त्यांना सहा स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. त्यांची अंतिम लढत चीनच्या लींग वेंग केंग आणि वँग सँग यांच्याशी होणार आहे.