

कौलून (हाँगकाँग) : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने शानदार कामगिरी करत हाँगकाँग ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनेही विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. मात्र, महिला एकेरीत रक्षिता रामराजचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
अल्मोडा येथील २५ वर्षीय लक्ष्यने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंगापूरच्या माजी विश्वविजेत्या लो केन यू याचा तीन गेममध्ये पराभव केला. आठव्या मानांकित लो केन यूविरुद्ध लक्ष्यने २१-१७, १०-२१, २१-१३ असा विजय नोंदवला. लक्ष्यने पहिला गेम जिंकून चांगली सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या गेममध्ये त्याला लय राखता आली नाही. तिसऱ्या गेममध्ये त्याने पुन्हा आक्रमक खेळ करत सामना जिंकला.
२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्यने यंदा हायलो ओपन आणि कुमामोटो मास्टर्स जपान स्पर्धेची विजेतेपदे मिळवली आहेत. त्याने यापूर्वीच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्रता मिळवली आहे. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना डेन्मार्कचा अँडर्स अँटोनसेन आणि चीनचा तिसरा मानांकित झू शुआन चेन यांच्यातील विजेत्याशी होईल.
पुरुष दुहेरीत पाचव्या मानांकित सात्विक आणि चिराग यांनी चीनच्या हू के युआन आणि लिन झियांग यी यांचा पराभव केला. भारतीय जोडीने ५९ मिनिटांच्या संघर्षानंतर २१-१२, १३-२१, २१-१६ असा विजय मिळवला. पहिला गेम सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीची पकड सैल झाली. मात्र, निर्णायक तिसऱ्या गेममध्ये त्यांनी पुन्हा लय मिळवत सामना आपल्या नावावर केला.
यंदाच्या हंगामात सिंगापूर आणि चीन ओपन या दोन सुपर ७५० स्पर्धांची विजेतेपदे मिळवणाऱ्या सात्विक-चिरागचा पुढील सामना डेन्मार्कच्या डॅनियल लुंडगार्ड-मॅड्स व्हेस्टरगार्ड किंवा मलेशियाच्या आठव्या मानांकित मॅन वेई चोंग-टी काई वून यांच्याशी होईल.
महिला एकेरीत भारताच्या रक्षिता रामराजला थायलंडच्या पाचव्या मानांकित पॉर्नपावी चोचुवोंगकडून १९-२१, १६-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, रक्षितासाठी ही स्पर्धा विशेष ठरली. तिने दुसऱ्या फेरीत चीनच्या दुसऱ्या मानांकित चेन यू फेई हिचा २१-१८, २४-२२ असा पराभव केला होता. त्याआधी डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टवरही विजय मिळवला होता. पुरुष एकेरीत श्रीकांतचाही पराभव झाला. थायलंडच्या कुन्लावतने श्रीकांतवर २१-१७, २१-७ असे वर्चस्व गाजवले.
लक्ष्यने सलग तिसऱ्या बॅडमिंटन स्पर्धेत किमान उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी दोन स्पर्धांमध्ये त्याने विजेतेपद पटकावले. त्यामुळे आता तो जेतेपदाची हॅटट्रिक साकारणार का, हे पाहणे रंजक ठरेल. लक्ष्य हा वर्षाखेरीस होणाऱ्या वर्ल्ड टूर फायनल्ससाठीदेखील पात्र ठरला आहे. एकूणच त्याच्यासाठी हे वर्ष फलदायी ठरत आहे.