हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

भारताच्या रक्षिता रामराज हिने गुरुवारी हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद करत टोकियो ऑलिम्पिक विजेती आणि जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाची चीनची चेन यू फेई हिला सरळ गेममध्ये पराभूत केले.
हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत
हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत(Photo-X)
Published on: 

कौलून (हाँगकाँग) : भारताच्या रक्षिता रामराज हिने गुरुवारी हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद करत टोकियो ऑलिम्पिक विजेती आणि जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाची चीनची चेन यू फेई हिला सरळ गेममध्ये पराभूत केले. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही गुरुवारी हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

भारताच्या पुरुष दुहेरीतील सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरियान अयुब आणि टॅन वी किओंग यांच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित भारतीय जोडीने ४२ मिनिटांत २१-१९, २१-१६ असा विजय मिळवला. यंदा सिंगापूर आणि चीन येथे दोन सुपर ७५० स्पर्धांची विजेतेपदे पटकावलेल्या सात्विक-चिराग यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना चीनच्या हू के युआन आणि लिन शियांग यी यांच्याशी होणार आहे. चिनी जोडीने जपानच्या काकेरू कुमागाई आणि हिरोकी निशी यांचा २१-१९, २१-१७ असा पराभव केला. पहिल्या फेरीत सात्विक-चिराग यांनी तैपेईच्या ली जे-हुई आणि यांग पो-हुआन यांच्यावर तीन गेममध्ये मात केली होती.

कोईम्बतूरची १९ वर्षीय रक्षिता ही पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये प्रशिक्षण घेते. तिने विशेषतः नेटजवळील आणि ओव्हरहेड फटक्यांमधील चतुराईपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत चेन यू फेईवर २१-१८, २४-२२ असा विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा तिच्या आतापर्यंतच्या सर्वात संस्मरणीय विजयांपैकी एक ठरला. पहिल्या फेरीतही तिने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टला पराभूत केले होते.

“हा माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विजयांपैकी एक आहे. चेन यू फेई माझी सर्वात आवडती खेळाडू आहे. तिच्याविरुद्ध जिंकले यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. त्यामुळे हा दिवस माझ्या बॅडमिंटन कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय दिवसांपैकी एक असेल,” असे रक्षिता म्हणाली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)