
चेन्नई : भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. येथे फिरकीपटूंना नेहमीच सहाय्य लाभते. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांचा पुन्हा एकदा कस लागणार आहे. मात्र मोहम्मद शमीची तंदुरुस्ती आणि अभिषेक शर्माला सरावादरम्यान झालेली दुखापत यामुळे भारतीय संघाची चिंता काहीशी वाढलेली आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला ७ गडी आणि ४३ चेंडू राखून धूळ चारली. सामनावीर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंनी पाच बळी मिळवले. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही छाप पाडून इंग्लंडला १३२ धावांत रोखले. मग अभिषेकच्या ३४ चेंडूंतील ७९ धावांमुळे भारताने १२.५ षटकांतच विजय साकारला होता. मात्र पहिल्या लढतीत शमीला स्थान देण्यात आले नव्हते. शमी पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही, याविषयी अद्याप संभ्रम कायम आहे. शुक्रवारी दोन्ही गुडघ्यांभोवती पट्टे बांधूनच तो गोलंदाजी करताना आढळला. नोव्हेंबर २०२३मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला शमी पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे १४ महिने क्रिकेटपासून दूर होता.
दरम्यान, शुक्रवारी क्षेत्ररक्षणाचा सराव करताना अभिषेकच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याचे आढळले. फिजिओच्या साथीने ड्रेसिंग रूममध्ये परतताना अभिषेकला वेदना होत असल्याचे दिसत होते. त्याने फलंदाजीचा सराव करणेही टाळले. त्यामुळे अभिषेक लढतीपूर्वी तंदुरुस्त न झाल्यास तिलक वर्मा सलामीला येऊ शकतो. तसेच ध्रुव जुरेल किंवा वॉशिंग्टन सुंदरपैकी एकाला संधी मिळू शकते.
इंग्लंडचा विचार करता कर्णधार जोस बटलर फॉर्मात आहे. मात्र अन्य फलंदाजांकडूनही इंग्लंडला योगदान अपेक्षित आहे. फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन हे भोपळाही फोडू शकले नव्हते. तसेच जेकब बेथल, हॅरी ब्रूक यांनीही निराशा केली. गोलंदाजीत इंग्लंडने काहीसा प्रतिकार केला. आदिल रशिदवर त्यांच्या फिरकीची भिस्त आहे. गस ॲटकिन्सन या लढतीला मुकणार आहे. चेन्नईत दवाचा घटक निर्णायक ठरत असल्याने धावांचा पाठलाग करणारा संघ सामना जिंकण्याची अधिक शक्यता आहे.
वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि हॉटस्टार ॲप