कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांची विराट गर्दी

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये तसेच स्टेडियमबाहेर गुरुवारी सकाळपासूनच चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली.
कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांची विराट गर्दी
Published on

नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये तसेच स्टेडियमबाहेर गुरुवारी सकाळपासूनच चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली. याचे खास कारण म्हणजे विराट कोहली. तब्बल १३ वर्षांनी दिल्लीसाठी रणजी सामना खेळणाऱ्या विराटला पाहण्यासाठी दिवसभरात १५,७४८ जणांनी कोटला स्टेडियम गाठल्याचे समजते.

दिल्ली आणि रेल्वे संघांमध्ये ड-गटातील शेवटची साखळी लढत गुरुवारपासून सुरू झाली. या लढतीद्वारे विराट २०१२नंतर प्रथमच रणजी स्पर्धेत पुनरागमन करत आहे. ऋषभ पंतला मात्र विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दिल्लीने रेल्वेला २४१ धावांत गुंडाळले. तसेच पहिल्या दिवसअखेर दिल्लीने १ बाद ४१ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर विराट फलंदाजीला येणार असल्याने शुक्रवारी चाहत्यांच्या गर्दीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

गुरुवारी सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वीच सकाळी ७.३० वाजता स्टेडियमबाहेर प्रेक्षकांची रांग लागली होती. या सामन्यासाठी १० हजार प्रेक्षक मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र चाहत्यांची गर्दी थांबत नसल्याने डीडीसीएला गौतम गंभीर स्टँडसह बिशनसिंग बेदी स्टँडचे प्रवेशद्वारही उघडावे लागले. त्यामुळे १५ हजारांहून अधिक चाहते गुरुवारी उपस्थित होते. काही चाहत्यांनी सामना सुरू असताना विराटला भेटण्यासाठी मैदानात धाव घेतली. त्यामुळे सुरक्षारक्षकांतही वाढ झाली. विराटने संपूर्ण लढतीत चाहत्यांचे मनोरंजन केले, हातवारे करून उत्साह वाढवला. रणजी सामन्यासाठी बऱ्याच वर्षांनी इतक्या चाहत्यांनी स्टेडियम गाठल्याचे दिसून आले. तसेच ऑनलाईन आणि टीव्हीवरही या लढतीचे थेट प्रेक्षपण करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in