"पोरगा पदक जिंकेल, याची खात्री होती; आम्ही त्याला बुधवारी..." स्वप्निल कुसळेच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

एकेकाळी स्वप्निलला नेमबाजीतील रायफल विकत घेऊन देण्यासाठी सुरेश यांनी कर्ज घेतले होते. त्यावेळी एका बुलेटची किंमत १५० ते २०० रुपये होती. एक बुलेट पुन्हा वापरू शकत नाही. त्यामुळे...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रस्वप्निल कुसळेचे आई, वडिल, आजी आणि भाऊ
Published on

मुंबई : पोरगा पदक जिंकेल, याची खात्री होती. आम्ही त्याला बुधवारी एकदाही फोन करून लक्ष विचलित करणे टाळले. पदक जिंकल्यावरच त्याच्याशी संवाद साधू, असे आम्ही ठरवले. गेल्या १२ वर्षांच्या मेहनतीचे फळ त्याला अखेर मिळाले, अशी प्रतिक्रिया भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळे याचे वडील सुरेश कुसळे यांनी व्यक्त केली.

एकेकाळी स्वप्निलला नेमबाजीतील रायफल विकत घेऊन देण्यासाठी सुरेश यांनी कर्ज घेतले होते. त्यावेळी एका बुलेटची किंमत १५० ते २०० रुपये होती. एक बुलेट पुन्हा वापरू शकत नाही. त्यामुळे ५०० बुलेटचा रोज सराव करण्यासाठी जवळपास ५० ते ६० हजारांच्या आसपास खर्च येणार होता. मात्र त्याच्या वडिलांनी स्वप्निलचे मनोबल ढासळू दिले नाही.

“सांगली येथे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश केल्यापासून तो सातत्याने कुटुंबापासून दूर आहे. गेल्या १०-१२ वर्षांत त्याला घरीही फारसा वेळ घालवता आला नाही. मात्र आम्हाला तो त्याच्या खेळासाठी किती मेहनत घेत आहे, हे ठाऊक होते. तो देशासाठी एक दिवस ऑलिम्पिक पदक जिंकेल, याची खात्री होती. त्याने आमचा विश्वास सार्थ ठरवला,” असे सुरेश म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in