२०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या स्वरूपात आयसीसीकडून निर्णायक बदल

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ‘आयसीसी’ने बुधवारी क्रिकेटच्या महाकुंभातील रोमांच आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी विश्वचषक स्पर्धेच्या रचनेत मोठे बदल जाहीर केले आहेत. २०२७ मधील एकदिवसीय विश्वचषक आता तीन टप्प्यांत खेळवला जाईल, तर २०२८ मधील टी-२० विश्वचषकातील सुपर-आठ फेरीचा विस्तार करून ती ‘सुपर १०’ करण्यात येणार आहे.
२०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या स्वरूपात आयसीसीकडून निर्णायक बदल
२०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या स्वरूपात आयसीसीकडून निर्णायक बदल
Published on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ‘आयसीसी’ने बुधवारी क्रिकेटच्या महाकुंभातील रोमांच आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी विश्वचषक स्पर्धेच्या रचनेत मोठे बदल जाहीर केले आहेत. २०२७ मधील एकदिवसीय विश्वचषक आता तीन टप्प्यांत खेळवला जाईल, तर २०२८ मधील टी-२० विश्वचषकातील सुपर-आठ फेरीचा विस्तार करून ती ‘सुपर १०’ करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामन्याला अधिक महत्त्व आणि चुरस मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयसीसीने आपल्या वार्षिक परिषदेत स्पष्ट केले.

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकात आधी ठरवल्याप्रमाणे १४ संघ सहभागी होतील. मात्र, आयसीसीने मूळ रचनेत बदल करत मुख्य साखळी फेरीपूर्वी एक ‘सुपर सिरीज’ फेरी आणि त्यानंतर उपांत्य फेरीपूर्वी ‘सुपर ७’ फेरीचा समावेश केला आहे. नवीन नियमांनुसार, क्रमवारीतील १२व्या ते १४व्या स्थानावरील संघ सुपर सिरीज फेरीत खेळतील आणि त्यातील विजेता संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल. दुसऱ्या फेरीत ६ संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी होईल. या दोन्ही ग्रुपमधील प्रत्येकी अव्वल ३ संघ आणि दोन्ही ग्रुप मिळून त्यानंतरचा सर्वोत्तम ठरलेला १ संघ असे एकूण ७ संघ ‘सुपर ७’ स्टेजसाठी पात्र ठरतील. या ‘सुपर ७’ मधील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत धडक मारतील.

या नव्या रचनेमुळे नवोदित संघांना क्रिकेटच्या सर्वात मोठ्या मंचावर खेळण्याची संधी मिळेल, असा विश्वास आयसीसीने व्यक्त केला. या स्पर्धेसाठी १० संघांना थेट प्रवेश मिळेल, ज्यामध्ये सहयजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. तिसरा सह-यजमान नामिबिया हा असोसिएट सदस्य असल्याने त्याला थेट प्रवेश मिळालेला नाही. उर्वरित ४ जागा जागतिक पात्रता फेरीतून ठरवल्या जातील.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये २०२८ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी आयसीसीने साखळी फेरीनंतर ‘सुपर ८’ ऐवजी ‘सुपर १०’ फेरी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ४ संघांचे ५ गट केले जातील आणि प्रत्येक ग्रुपमधील अव्वल २ संघ ‘सुपर १०’ मध्ये प्रवेश करतील. गेल्या विश्वचषकाप्रमाणेच प्रत्येक गटातील अव्वल २ संघ थेट उपांत्य फेरीत जाण्याऐवजी, आता केवळ आपापल्या गटात अव्वल राहणारा संघच उपांत्य फेरीत जाईल. दुसऱ्या स्थानावरील संघ विरुद्धच्या गटातील तिसऱ्या स्थानावरील संघाविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळतील. त्यामुळे थरार आणखी वाढणार आहे.

२०२६च्या टी-२० विश्वचषकातील नवोदित संघांची कामगिरी पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे आयसीसीने नमूद केले. बांगलादेशऐवजी ऐनवेळी सहभागी झालेल्या स्कॉटलंडला २०२६ मधील विशेष परिस्थितीमुळे थेट युरोप प्रादेशिक फायनलमध्ये प्रवेश मिळेल. २०२६चा विश्वचषक खेळलेले परंतु थेट पात्र न ठरलेले इतर संघ थेट ग्लोबल क्वालिफायरमध्ये खेळतील. आयसीसी डेव्हलपमेंट आणि चीफ एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या शिफारशीनंतर बोर्डाने याला मंजुरी दिली असून, नोव्हेंबरमधील बैठकीत फायनान्स कमिटीच्या पुनरावलोकनानंतर यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

दरम्यान, सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघांत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. गुरुवारी दुसरी लढत खेळवण्यात येईल.

  • आयसीसीने मूळ रचनेत बदल करत मुख्य साखळी फेरीपूर्वी एक ‘सुपर सिरीज’ फेरी आणि त्यानंतर उपांत्य फेरीपूर्वी ‘सुपर ७’ फेरीचा आता समावेश केला आहे.

  • नवीन नियमांनुसार, क्रमवारीतील १२व्या ते १४व्या स्थानावरील संघ सुपर सिरीज फेरीत खेळतील आणि त्यातील विजेता संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल. दुसऱ्या फेरीत ६ संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी होईल.

  • या दोन्ही ग्रुपमधील प्रत्येकी अव्वल ३ संघ आणि दोन्ही ग्रुप मिळून त्यानंतरचा सर्वोत्तम ठरलेला १ संघ असे एकूण ७ संघ ‘सुपर ७’ स्टेजसाठी पात्र ठरतील. या ‘सुपर ७’ मधील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत धडक मारतील. त्यामुळे क्रमवारीत खालच्या स्थानी असलेल्या संघांना संधी मिळेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in