शमी, गिलमुळे भारताचा शुभारंभ; बांगलादेशवर पहिल्या लढतीत ६ गडी राखून वर्चस्व; हृदयचे शतक व्यर्थ

तारांकित वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (५३ धावांत ५ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्यानंतर युवा सलामीवीर शुभमन गिलने (१२९ चेंडूंत नाबाद १०१ धावा) झुंजार शतक साकारले.
शमी, गिलमुळे भारताचा शुभारंभ; बांगलादेशवर पहिल्या लढतीत ६ गडी राखून वर्चस्व; हृदयचे शतक व्यर्थ
@BCCI
Published on

दुबई : तारांकित वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (५३ धावांत ५ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्यानंतर युवा सलामीवीर शुभमन गिलने (१२९ चेंडूंत नाबाद १०१ धावा) झुंजार शतक साकारले. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारताने शानदार विजयी सलामी नोंदवताना बांगलादेशला ६ गडी आणि २१ चेंडू राखून धूळ चारली.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अ-गटातील या सामन्यात बांगलादेशने दिलेले २२९ धावांचे लक्ष्य भारताने ४६.३ षटकांत गाठले. गिलने ९ चौकार व २ षटकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील आठवे तसेच सलग दुसरे शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या लढतीतही गिलने शतक साकारले होते. गिलला कर्णधार रोहित शर्मा (३६ चेंडूंत ४१ धावा) आणि यष्टीरक्षक के. एल. राहुल (४७ चेंडूंत नाबाद ४१ धावा) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताला काहीसा संथ मात्र अपेक्षित विजय मिळवता आला. गिललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता रविवारी भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडेल.

पाकिस्तान येथे ८ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ८ संघांचा समावेश असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात भारतीय संघ मात्र त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. २०१३नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी आतुर असलेला भारताने पहिल्याच लढतीत बांगला टायगर्सची शिकार करून अन्य संघांना इशारा दिला आहे.

बांगलादेशचा कर्णधार नजमूल शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने या लढतीसाठी अर्शदीप सिंगच्या जागी शमीसह हर्षित राणाला संधी दिली. तसेच वरुण चक्रवर्तीच्या ऐवजी कुलदीप यादवला प्राधान्य दिले. शमीने पहिल्याच षटकात सौम्य सरकारचा अडसर दूर करून भारताला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर हर्षितने शांतोला शून्यावरच तंबूत धाडले. मेहदी हसनही (५) फारशी छाप पाडू शकला नाही व शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. हे कमी म्हणून की काय अक्षर पटेलने सलग दोन चेंडूंवर तांझिद हसन (२५) व मुशफिकूर रहिम (०) यांना बाद करून बांगलादेशची ५ बाद ३५ अशी अवस्था केली.

अक्षरला हॅटट्रिकची संधी होती. मात्र स्लीपमध्ये रोहितने जेकर अलीचा सोपा झेल सोडला. त्याने लगेचच अक्षरची माफीही मागितली. मात्र याचा लाभ घेत जेकर व तौहिद हृदय यांनी भारताला हैराण केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी रचली. शमीनेच जेकरला ६८ धावांवर बाद करून ही जोडी फोडली. हृदयने मात्र ६ चौकार व २ षटकारांसह कारकीर्दीतील पहिलेच शतक साकारले. त्यामुळे बांगलादेशने किमान २०० धावांचा पल्ला गाठला. अखेर ५०व्या षटकांत हर्षितने हृदयला बाद करून बांगलादेशचा डाव २२८ धावांवर संपुष्टात आणला. भारतासाठी शमीने ५, हर्षितने ३, तर अक्षरने २ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित व गिल यांच्या जोडीने धडाक्यात सुरुवात करताना १० षटकांतच ६९ धावा फटकावल्या. रोहित ३६ चेंडूंत ४१ धावा फटकावून बाद झाल्यावर भारताची धावगती मंदावली. विराट कोहली (२२), श्रेयस अय्यर (१५), अक्षर पटेल (८) यांनी निराशा केल्यामुळे भारतीय संघ एकवेळ ४ बाद १४४ अशा स्थितीत होती. मात्र गिलने एकदिवसीय कारकीर्दीतील आठवे शतक झळकावून संघाला सावरले. राहुलनेही १ चौकार व २ षटकारांसह त्याला सुरेख साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. राहुलनेच ४७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. सामनावीर पुरस्कारासाठी शमी व गिलमध्ये चुरस होती. मात्र यामध्ये गिलने बाजी मारली.

दरम्यान, पाकिस्तानमधील सुरक्षा आणि दोन्ही देशांमधील बिघडलेले राजकीय संबंध यामुळे भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. पीसीबी आणि बीसीसीआय यांनी आयसीसीशी केलेल्या करारानुसार आता पाकिस्तानमधील आयसीसी स्पर्धेसाठी भारतीय संघ तेथे जाणार नाही. तसेच भारतातील आयसीसी स्पर्धेसाठीही पाकिस्तानचा महिला अथवा पुरुष संघ आपल्या देशात येणार नाही. आयसीसीने व पीसीबीमध्ये झालेल्या करारानुसार भारतात होणाऱ्या २०२६चा टी-२० विश्वचषक व २०२५च्या महिलांच्या विश्वचषकात पाकिस्तानचे सामने अन्य देशात खेळवण्यात येतील.

सामन्यातील हे आकडे खास

११,००० भारताचा कर्णधार रोहित शर्माने या लढतीत एकदिवसीय क्रिकेटमधील ११ हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर (१८,४२६), विराट कोहली (१३,९६३), सौरव गांगुली (११,२२१) यांचा क्रमांक लागतो. रोहितला या लढतीपूर्वी ११ हजार धावांसाठी फक्त १२ धावांची गरज होती. त्याने मुस्तफिझूरला चौकार लगावून औपचारिकता पूर्ण केली.

भारतासाठी सर्वात जलद ११ हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहितने दुसरे स्थान मिळवले. विराटने २२२ डावांत, तर रोहितने २६१ डावांत ही कामगिरी केली.

३३ भारताने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय प्रकारात ३३वा विजय नोंदवला. उभय संघांतील ४२ सामन्यांपैकी बांगलादेशने फक्त ८ लढती जिंकल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा हा बांगलादेशविरुद्धचा सलग दुसरा विजय ठरला. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने बांगलादेशला उपांत्य फेरीत धूळ चारली होती.

१५६ विराटने भारतासाठी एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले. विराट व मोहम्मद अझरुद्दीन या दोघांनीही १५६ झेल घेतले आहेत. विराटला पुढील लढतीत अझरुद्दीनला मागे टाकण्याची संधी आहे.

१५४ तौहिद हृदय आणि जेकर अली यांनी बांगलादेशसाठी भारताविरुद्ध सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची सर्वोत्तम भागीदारी रचली. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येसुद्धा ही सहाव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी ठरली.

शमीच्या सर्वात जलद २०० विकेट्स

मोहम्मद शमीने एकदिवसीय प्रकारात भारतासाठी सर्वात जलद २०० बळी मिळवण्याचा पराक्रम केला. या लढतीपूर्वी शमीचे १९७ बळी होते. ४३व्या षटकात जेकर अलीला बाद करून शमीने २०० बळींचा टप्पा गाठला. शमीने १०४ सामन्यांत २०० बळी मिळवले. त्याने अजित आगरकरला मागे टाकले. आगरकरने १३३ लढतींमध्ये २०० एकदिवसीय बळी गारद केले होते. तसेच विश्वातील सर्व गोलंदाजांचा विचार करता शमीने सर्वात जलद २०० बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने १०२ सामन्यांत हा पराक्रम केला होता. शमीच्या शानदार पुनरागमनामुळे भारताला गुरुवारी जसप्रीत बुमराची उणीव जाणवली नाही.

फखर स्पर्धेबाहेर; इमाम पाकिस्तान संघात

पाकिस्तानचा डावखुरा सलामीवीर फखर झमान स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे फखरच्या जागी इमाम उल हकचा पाकिस्तानच्या संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी झालेल्या सलामीच्या लढतीत क्षेत्ररक्षण करताना फखरला दुखापत झाली. त्यानंतर तो फलंदाजीसही चौथ्या क्रमांकावर आला. त्यावेळीही फखरला वेदना जाणवत होत्या. अखेर गुरुवारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने तो स्पर्धेबाहेर गेल्याचे सांगितले. भारत-पाकिस्तान यांच्यात रविवार, २३ फेब्रुवारीला मुकाबला होणार आहे. २०१७मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत फखरने भारताविरुद्ध शतक झळकावले होते.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : ४९.४ षटकांत सर्व बाद २२८ (तौहिद हृदय १००, जेकर अली ६८; मोहम्मद शमी ५/५३, हर्षित राणा ३/३१) पराभूत वि. भारत : ४६.३ षटकांत ४ बाद २३१ (शुभमन गिल नाबाद १०१, रोहित शर्मा ४१, के. एल. राहुल नाबाद ४१)

सामनावीर : शुभमन गिल

logo
marathi.freepressjournal.in