
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे नववे पर्व सुरू होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक आहेत. उद्यापासून (दि.१९) ही बहुप्रतिक्षित स्पर्धा सुरू होत आहे. २०१७ नंतर प्रथमच म्हणजे आठ वर्षांनी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यंदा पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. मात्र भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील सामने एकदिवसीय प्रकारात (५० षटकांचे) होणार असून संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारताचा समावेश 'अ' गटात आहे. भारतासोबत पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड या गटात आहेत. तर, ब गट अर्थात ग्रुप ऑफ डेथमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. ‘नवशक्ति’च्या वाचकांसाठी आठही संघांचा घेतलेला हा धावता आढावा. (संकलन : ऋषिकेश बामणे)
पाकिस्तानपुढे जेतेपद राखण्याचे आव्हान!
कर्णधार : मोहम्मद रिझवान
सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०१७)
२०१७मध्ये भारताला नमवून पाकिस्तानने प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. आता ८ वर्षांनी मायदेशात खेळताना जेतेपद राखण्याचे पाकिस्तानचे ध्येय असेल. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाची वेगवान गोलंदाजीवर अधिक भिस्त आहे. बाबर आझम, फखर झमान, सलमान अघा यांच्यावर पाकिस्तानची फलंदाजी अवलंबून आहे. नसीम शाह, शाहीन आफ्रिदी व हॅरीस रौफ यांचे वेगवान त्रिकुट कोणत्याही फलंदाजांच्या फळीवर भारी पडू शकते. बेभरवशी क्रिकेटसाठी क्रिकेटसाठी ओळखला जाणारा हा संघ किमान उपांत्य फेरीसाठी दावेदार नक्कीच आहे.
संघ : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर झमान, कामरान घुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अघा, उस्मान खान, अब्रार अहमद, हॅरिस रौफ, मोहम्मद हस्नैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.
बांगलादेश : बांगला टायगर्सपासून सावध !
कर्णधार : नजमूल होसेन शांतो
सर्वोत्तम कामगिरी : उपांत्य फेरी (२०१७)
सांघिक कामगिरी जुळून आल्यास कोणत्याही बलाढ्य संघांला नमवण्याची कुवत बांगलादेशमध्ये आहे. आतापर्यंत फक्त एकदाच चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्य फेरी गाठणाऱ्या बांगलादेशला कमी लेखणे अन्य संघांना महागात पडू शकते. तस्किन अहमद, मुस्तफिझूर रहमान या अनुभवी वेगवान गोलंदाजांकडून बांगलादेशला अपेक्षा आहेत. तसेच अष्टपैलू मेहदी हसन त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. मुशफिकूर रहिम, रियाद महमदुल्ला, सौम्य सरकार यांच्याकडे २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याचा अनुभवही आहे.
संघ : नजमूल होसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तांझिद हसन, तौहिद हृदय, मुशफिकूर रहिम, रियाद महमदुल्ला, जेकर अली, मेहदी हसन, रिशाद होसैन, तस्किन अहमद, मुस्तफिझूर रहमान, परवेझ हौसेन, नसुम अहमद, तांझिम हसन, नाहिद राणा.
न्यूझीलंड : किवी यंदाही डार्क हॉर्स !
कर्णधार : मिचेल सँटनर
सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०००)
नेहमीप्रमाणे यावेळीही आयसीसी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड संघाविषयी कोणीही फारशी चर्चा करताना आढळत नाही. मात्र कौशल्यवान खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघात जेतेपद मिळवण्याची क्षमता नक्कीच आहे. ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीत लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री यांच्यावर किवी संघाच्या गोलंदाजीची मदार आहे. तसेच अनुभवी केन विल्यम्सन, टॉम लॅथम, डॅरेल मिचेल यांचे त्रिकुट फलंदाजीत छाप पाडण्यास आतुर आहे. कर्णधार मिचेल सँटनर व ग्लेन फिलिप्स यांचे अष्टपैलू योगदान संघासाठी निर्णायक भूमिका बजावू शकते.
संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), डेवॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, केन विल्यम्सन, टॉम लॅथम, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, विल ओरूर्क, विल यंग, मार्क चॅपमन, नॅथन स्मिथ, जेकब डफी.
ऑस्ट्रेलिया: गोलंदाजांची कांगारूंना चिंता!
कर्णधार : स्टीव्ह स्मिथ
सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२००६, २००९)
पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क या अनुभवी वेगवान त्रिकुटाच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला गोलंदाजांची चिंता सतावत आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ यंदा कशी कामगिरी करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ट्रेव्हिस हेड, स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर कांगारू संघाची फलंदाजी अवलंबून आहे. मात्र गोलंदाजी विभागात स्पेन्सर जॉन्सन, नॅथन एलिस, सीन ॲबट असे तुलनेने नवखे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. फिरकीपटू ॲडम झाम्पा मात्र पुन्हा एकदा हुकमी एक्का ठरू शकतो.
संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, सीन ॲबट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लबूशेन, जेक फ्रेसर, बेन ड्वारशुईस, तन्वीर संघा.
इंग्लंड : गतवैभव पुन्हा मिळवण्याचे ध्येय !
कर्णधार : जोस बटलर
सर्वोत्तम कामगिरी : उपविजेतेपद (२००४, २०१३)
२०१९मध्ये आक्रमक शैलीचे क्रिकेट खेळून एकदिवसीय विश्वचषक उंचावणारा इंग्लंडचा संघ त्यानंतर सातत्याने या प्रकारात ढेपाळत चालला आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात चक्क सातव्या स्थानी राहणाऱ्या या संघाला नुकताच भारताविरुद्धही व्हाइटवॉश पत्करावा लागला. त्यामुळे इंग्लंडपुढे गतवैभव पुन्हा मिळवण्याचे आव्हान असेल. जोस बटलर, जो रूट व फिल सॉल्ट यांच्यावर त्यांची फलंदाजी अवलंबून आहे. गोलंदाजीत मार्क वूड, जोफ्रा आर्चर व फिरकीपटू आदिल रशिद इंग्लंडसाठी महत्त्वाचे ठरतील.
संघ : जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हर्टन, जेमी स्मिथ, ब्रेडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशिद, मार्क वूड, टॉम बँटन, गस ॲटकिन्सन, सकिब महमूद.
अफगाणिस्तान: धक्कातंत्रासाठी सज्ज !
कर्णधार : हश्मतुल्ला शाहिदी
सर्वोत्तम कामगिरी : प्रथमच स्पर्धेस पात्र
२०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात बलाढ्य संघांना धक्के दिल्यानंतर २०२४च्या टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आता प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झाल्यावर हा संघ पुन्हा एकदा धक्कातंत्रासाठी सज्ज आहे. ब-गटाला ‘ग्रुप ऑफ डेथ’ असे ओळखले जात असून या गटातून अफगाणिस्तानने अग्रस्थान मिळवले, तरी आश्चर्य वाटणार नाही. रशिद खान, रहमनुल्ला गुरबाझ, मोहम्मद नबी असे अनुभवी आणि दडपणाखाली कामगिरी उंचावणारे खेळाडू अफगाणिस्तानची ताकद आहेत.
संघ : हश्मतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झादरान, रहमनुल्ला गुरबाझ, रहमत शाह, अझमतुल्ला ओमरझाई, गुलबदीन नैब, मोहम्मद नबी, रशिद खान, नूर अहमद, नांगेलिया खरोटे, नवीद झादरान, फझलहक फारुकी, सेदिउल्ला अटल, इक्रम अलिखिल, फरीद अहमद.
दक्षिण आफ्रिका : पूर्वीचे चोकर्स ; आता दावेदार!
कर्णधार : टेम्बा बाव्हुमा
सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (१९९८)
गेल्या २-३ वर्षांत दक्षिण आफ्रिका संघाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत चोकर्सचा शिक्का पुसून भरारी घेतली आहे. त्यामुळे यंदाही या संघाला जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक मानले जात आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात उपांत्य, तर २०२४च्या टी-२० विश्वचषकात अंतिम फेरीत पराभव पत्करणारा आफ्रिका संघ यावेळी आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणू शकतो. कगिसो रबाडा, मार्को यान्सेन व फिरकीपटू केशव महाराज असे गोलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. धोकादायक हेनरिच क्लासेन व डेव्हिड मिलर कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतात.
संघ : टेम्बा बाव्हुमा (कर्णधार), रायन रिकेलटन, रासी वॅन डर दुसेन, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी, टॉनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बोश, वियान मल्डर.
टीम इंडियाची एका तपानंतर स्वप्नपूर्ती ?
कर्णधार : रोहित शर्मा
सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२००२, २०१३)
२०१३मध्ये भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आता रोहित शर्माचे शिलेदार १२ वर्षांनी भारतासाठी पुन्हा हा करंडक उंचावणार का, हे पाहणे रंजक ठरेल. जायबंदी जसप्रीत बुमराच्या माघारीचा भारताला फटका बसला असला तरी संघात असंख्य प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. फलंदाजीत प्रामुख्याने रोहित आणि विराट कोहली या अनुभवी जोडीवर चाहत्यांचे लक्ष असेल. त्याशिवाय शुभमन गिल, श्रेयस अय्यर मोलाची भूमिका बजावू शकतात. फिरकीपटूंचे पंचक भारतासाठी या स्पर्धेत निर्णायक ठरेल.
संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.