IND vs NZ : 'अ' गटातील अग्रस्थानासाठी आज झुंज; फिरकीपटूंविरुद्ध धावा जमवण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य, राखीव खेळाडूंना संधी मिळणार?

ICC Champions Trophy 2025: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या साखळी लढतीतील अखेरचा सामना होणार आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीत दाखल झाले असून विजेता संघ गटात अव्वल स्थानी राहणार आहे. फिरकीपटू गोलंदाजांविरुद्ध धावा जमवण्यासह काही खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न भारताचा असेल.
IND vs NZ : 'अ' गटातील अग्रस्थानासाठी आज झुंज; फिरकीपटूंविरुद्ध धावा जमवण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य, राखीव खेळाडूंना संधी मिळणार?
एक्स @ICC
Published on

दुबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या साखळी लढतीतील अखेरचा सामना होणार आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीत दाखल झाले असून विजेता संघ गटात अव्वल स्थानी राहणार आहे. फिरकीपटू गोलंदाजांविरुद्ध धावा जमवण्यासह काही खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न भारताचा असेल.

या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ ‘अ’ गटात अव्वल स्थानी पोहचेल. ब गटातून आधीच दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे यांच्यापैकी एका संघाशी भारताची लढत उपांत्य फेरीत होईल. या दोन्ही संघांतील फिरकी गोलंदाज फॉर्मात आहेत.

स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत फिरकी गोलंदाजांविरोधात भारतीय फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडचा संघही उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. या संघातील फिरकी गोलंदाज भारताला आव्हान देऊ शकतात. भारताच्या स्टार फलंदाजांनी बांगलादेशच्या मेहिदी हसन मिरझ (०/३७) आणि रिषद होसेन (२/३८) या फिरकीपटूंसह पाकिस्तानचा लेग स्पिनर अब्रार अहमद (१/२८) विरुद्धही धोका पत्करला नव्हता.

रविवारी होणाऱ्या सामन्यात मिचेल सँटनर आणि मायकल ब्रेसवेल घातक ठरू शकतात. किवींचे दोन्ही फिरकीपटू फॉर्मात आहेत. दुबईतल्या खेळपट्टीवर ते चांगली कामगिरी करू शकतात असे जाणकारांचे म्हणणे आहे.

भारतीय फलंदाजही हुशार आहेत. फिरकीपटूंविरोधात सिंगल, डबल धावा जमवण्याची क्षमता भारतीय संघात आहे. वेगवान गोलंदाजांविरोधात भारताचे फलंदाज मोठे फटके मारण्यात यशस्वी होत आहेत. परंतु सँटनर आणि ब्रेसवेल यांच्या २० षटकांनंतर पार्ट टाईम फिरकीपटू ग्लेन फिलिप्सच्या काही षटकांचा सामना भारताच्या फलंदाजांना करावा लागू शकतो.

गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेत सँटनर आणि फिलिप्स यांच्या विरुद्ध भारताच्या फलंदाजांनी निराश केले होते. भारताने ही मालिका ०-३ अशी गमावली होती. या दोन गोलंदाजांसह आता ब्रेसवेलचा सामना करण्याचे आव्हान असेल. या ऑफ स्पिनरने गेल्या दोन सामन्यांत लक्ष वेधून घेतले आहे. त्याने केवळ ३.२ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

भारताचा शुभमन गिल चांगलाच लयीत आहे. विराटच्या बॅटमधून धावा जमल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १०० धावांची खेळ खेळली आहे. त्यामुळे त्याच्यासह संघाचेही मनोबल उंचावले आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनीही गेल्या दोन सामन्यांत लक्षवेधक फलंदाजी केली आहे.

राखीव खेळाडूंना संधी मिळणार?

रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली जाऊ शकते. रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात थोडा त्रास होत होता. त्यामुळे त्याला विश्रांती देऊन पंतला संधी देण्याचा विचार व्यवस्थापन करू शकते. तसेच वेगवान गोलंदाज शमीच्या पायाला दुखापत झाली आहे. या सामन्यात त्याला आराम दिला जाऊ शकतो. त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग संघात येऊ शकतो. कुलदीप यादव अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्यामुळे त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

श्रेयसने खेळाडूला दिले शूज गिफ्ट

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सराव सत्रात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने नेट गोलंदाज जस्कीरन सिंगला शूज गिफ्ट दिले. जस्कीरन हा व्यवसायाने सीए असून तो क्रिकेट खेळाडू आहे. सराव सत्रात तो लाँग ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी अय्यर त्याला म्हणाला की, मित्रा कसा आहेस? सर्वकाही ठिक आहे ना? त्यानंतर श्रेयसने जवळ जात जस्कीनला त्याच्या शूजचा नंबर विचारला. त्यावर जस्कीनने १० नंबर असे उच्चारले. मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे असे सांगत श्रेयसने त्याला शूज गिफ्ट म्हणून दिले.

फिरकीपटूंची शानदार कामगिरी

दुबईच्या खेळपट्टीवर फिरकीपटू प्रभावी कामगिरी करत आहेत. भारताने रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर या फिरकी गोलंदाजांची संघात निवड केली आहे. याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. या मैदानावर अलिकडेच एक स्पर्धा झाली. त्यानंतर येथील खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल ठरत आहे. जडेजा, अक्षर आणि कुलदीप या भारताच्या फिरकीपटूंनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना नियंत्रणात ठेवले आहे. गोलंदाजांच्या या तिकडीने विशेष अशी कामगिरी केली नसली तरी मधल्या षटकांत धावा रोखण्याचे काम केले. पाकिस्तानविरुद्धचा सामना याचे उदाहरण आहे.

मॅथ्यू शॉर्ट उपांत्य फेरीला मुकणार?

उपांत्य फेरीआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला एक धक्का बसण्याची शक्यता आहे. फगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी झालेल्या लढतीदरम्यान संघाचा सलामीवीर मॅथ्यू शॉर्टला दुखापत झाली आहे. भारत किंवा न्यूझीलंड यांच्याविरुद्ध होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीला शॉर्ट मुकण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्ध शॉर्टने १५ चेंडूंत २० धावा तडकावल्या. या सामन्यात अझमतुल्लाह ओमरझाईने शॉर्टला बाद केले. बाद होण्यापूर्वी त्याला दुखापतीचा त्रास होत होता.

logo
marathi.freepressjournal.in