
बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे नववे पर्व थोड्याच वेळात सुरू होणार आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड या सलामीच्या सामन्याद्वारे ही स्पर्धा सुरू होत आहे. २०१७ नंतर प्रथमच म्हणजे आठ वर्षांनी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यंदा पाकिस्तानमध्ये होत असून भारतीय संघ मात्र त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. स्पर्धेआधी पीसीबीने गदाफी स्टेडियममध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांचे राष्ट्रीय ध्वज लावले होते, पण त्यात भारताचा ध्वज नव्हता. त्यावरुन बराच वाद निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानने एक पाऊल मागे घेतलं आहे. सलामीच्या लढतीच्या पूर्वसंध्येलाच कराचीच्या स्टेडियममध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज लावल्याचं समोर आलं आहे.
मंगळवारी संध्याकाळी नॅशनल स्टेडियम कराचीमध्ये भारताचा तिरंगा झळकला. त्याचे फोटो-व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या गदाफी स्टेडियमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य सर्व देशांचे ध्वज फडकताना दिसत होते. मात्र, भारताचा तिरंगा फडकवण्यात आला नव्हता. त्यावरुन पाकिस्तानवर आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डावर बरीच टीका झाली होती.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही भारताचा ध्वज इतर सहभागी राष्ट्रांसोबत फडकवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया दिली होती. "प्रथम, भारतीय ध्वज तेथे आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. जर तो तेथे नव्हता, तर तो लावायला हवा होता. सर्व सहभागी राष्ट्रांचे ध्वज तेथे असायला हवे होते," असे राजीव शुक्ला यांनी मंगळवारी दिल्लीतील रेस्टॉरंट क्रिकेट लीगच्या वेळी लाइव्हमिंटशी बोलताना म्हणाले. याबाबत बोलताना, "आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फक्त चार ध्वज फडकवण्याचा सल्ला दिला आहे, ज्यात आयसीसी , पीसीबी आणि दोन सहभागी संघांचा समावेश आहे", असे पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने आयसीसीच्या नियमांचा हवाला देत या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, स्पर्धा सुरू होण्यआधी तिरंगा कराची स्टेडियममध्ये झळकल्याने या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.