
१९ फेब्रुवारीपासून ८ संघांत सुरू झालेले चॅम्पियन्स ट्रॉफीचे नववे पर्व आता उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असला तरी आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळत आहे.
अ-गटातून अग्रस्थानासह उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताने साखळीत विजयी हॅटट्रिक साकारली. प्रथम बांगलादेश व नंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने धूळ चारली. मग रविवारी किवी म्हणजेच न्यूझीलंड संघाविरुद्ध फिरकीच्या बळावर भारताने २४९ धावांचा यशस्वी बचाव केला. त्यामुळे आता २००२ व २०१३नंतर तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी आतुर असलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचाही काटा काढणार का, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे. मुख्य म्हणजे २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियानेच अंतिम फेरीत भारताला पराभूत करून कोट्यवधी चाहत्यांचा अपेक्षाभंग केला होता. त्या पराभवाचा वचपा घेण्याची भारताकडे यावेळी संधी आहे. दुबईच्या रणांगणात आज पहिल्या उपांत्य सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया एकेमकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता ही लढत सुरू होईल.
बघा 'हेड टू हेड' आकडे
एकदिवसीय सामन्यांत कोणाचे जास्त विजय?
सर्व एकदिवसीय सामन्यांच्या आकडेवारीबाबत सांगायचे झाल्यास दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १५१ सामने झालेत. त्यापैकी तब्बल ८४ वेळेस ऑस्ट्रेलिया तर केवळ ५७ वेळेस भारताला विजय मिळवता आला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण वरचढ?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघांत आतापर्यंत चार वेळेस लढत झाली. त्यात भारताचा वरचष्मा राहिलाय. चारपैकी दोन लढतीत भारताने आणि एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवलाय (एक सामना अनिर्णित).
एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये काय स्थिती?
दोन्ही संघ वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण १४ वेळेस एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलिया ९ आणि भारत केवळ एकाच सामन्यात विजयी ठरला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, सीन ॲबट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लबूशेन, जेक फ्रेसर, बेन ड्वारशुईस, तन्वीर संघा, कूपर कोनोली.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्पोर्ट्स १८ वाहिनी, जिओहॉटस्टार ॲप