
पाकिस्तानातील कराची नॅशनल स्टेडियमवर आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होत असून पहिल्या लढतीत गतविजेत्या पाकिस्तानसमोर न्यूझीलंडचे आव्हान असेल. थोड्याच वेळात या सामन्याला सुरूवात होईल. या लढतीत प्रामुख्याने बाबर आझम आणि केन विल्यम्सन या तारांकित फलंदाजांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानला नुकताच तिरंगी मालिकेत न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र आता ते नव्या जोमाने खेळतील. सय्यम अयूब स्पर्धेबाहेर गेल्याने बाबर या स्पर्धेत सलामीला येणार आहे. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह व हॅरिस रौफ यांच्यावर पाकिस्तानची गोलंदाजी अवलंबून आहे. रौफ या लढतीसाठी तंदुरुस्त आहे.
दुसरीकडे मिचेल सँटनर न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करणार आहे. रचिन रवींद्रबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. त्याला क्षेत्ररक्षण करतानाच डोक्यावर चेंडू लागला होता. डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स उत्तम लयीत आहेत. ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीत मॅट हेन्री व कायले जेमिसन यांच्यावर न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याची भिस्त असेल. पाकिस्तानमधील वेळेनुसार दुपारी २ वाजता, तर भारतीय वेळेनुसार २.३० वाजता लढत सुरू होईल.
बघा 'हेड टू हेड' आकडे
पाक-न्यूझीलंड संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत ११८ वेळेस आमने-सामने आलेत. त्यापैकी पाकिस्तानने ६१ तर न्यूझीलंडने ५३ वेळेस विजय मिळवलाय. एक सामना टाय झाला तर तीन सामने अनिर्णित राहिलेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण वरचढ?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघांत आतापर्यंत तीन वेळेस लढत झाली. पण त्यात न्यूझीलंडचाच संघ वरचढ ठरल्याचं दिसतंय. सर्व तिन्ही लढतीत पाकला पराभवाचा सामना करावा लागलाय.
सर्वाधिक धावा कोणाच्या?
वनडे सामन्यांत दोन्ही संघापैकी सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या तीन खेळाडूंमध्ये पाकचे दोन खेळाडू असले तरी पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसन आहे. त्याने २४ डावांमध्ये १२९० धावा (५६.०८ सरासरी, ८४.४४ स्ट्राइक रेट) केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर इंझमाम उल हक (४२ डावांत १२८३ धावा) आणि तिसऱ्या क्रमांकावर सईद अन्वर (३२ डावांत १२६० धावा) आहे.
सर्वाधिक बळी कोणाचे?
वनडे सामन्यांत दोन्ही संघापैकी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या तीन गोलंदाजांमध्ये वकार युनूस (३७ डाव, ७९ विकेट) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर वसिम अक्रम (३६ डाव, ६४ विकेट) आणि तिसऱ्या क्रमांकावर डॅनी मॉरीसन (२४ डाव, ३९ विकेट) आहे.
प्रतिस्पर्धी संघ
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर झमान, कामरान घुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अघा, उस्मान खान, अब्रार अहमद, हॅरिस रौफ, मोहम्मद हस्नैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), डेवॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, केन विल्यम्सन, टॉम लॅथम, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, विल ओरूर्क, विल यंग, मार्क चॅपमन, नॅथन स्मिथ, जेकब डफी, कायले जेमिसन.