वेळ दवडल्यास पाच धावांचा दंड, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ‘स्टॉप क्लॉक’चा नियम; टी-२० वर्ल्डकपपासून होणार लागू

टी-२० आणि एकदिवसीय क्रीडा प्रकारांच्या सामन्यांत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अधिक वेळ दवडू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘स्टॉप क्लॉक’चा नियम बंधनकारक केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नवीन स्टॉप क्लॉक नियम |
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नवीन स्टॉप क्लॉक नियम | सौजन्य - X

दुबई : टी-२० आणि एकदिवसीय क्रीडा प्रकारांच्या सामन्यांत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अधिक वेळ दवडू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘स्टॉप क्लॉक’चा नियम बंधनकारक केला आहे. जूनमध्ये रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकापासून हा नियम लागू करण्यात येणार असून याद्वारे ६० सेकंदांच्या दरम्यान दुसरे षटक सुरू करणे अनिवार्य असेल. दोन वेळा ताकीद देऊनही तसे न झाल्यास तिसऱ्या वेळेस त्या संघाला पाच धावांचा दंड ठोठावण्यात येईल.

टी-२० तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेकदा दडपणाखाली क्षेत्ररक्षण करणारा संघ नवीन षटक सुरू करण्यात अधिक वेळ घेतो. यामुळे आपोआपच सामना लांबतो व प्रेक्षकांचा खोळंबा होतो. आतापर्यंत निर्धारित वेळेत षटक पूर्ण न केल्यास खेळाडू तसेच कर्णधाराला पैशांच्या स्वरूपात दंड आकारला जायचा. तसेच अखेरच्या षटकात ३० यार्ड सर्कलमध्ये एक अतिरिक्त खेळाडूही ठेवण्याचे बंधन होते. मात्र डिसेंबर २०२३मध्ये आयसीसीने ‘स्टॉप क्लॉक’ नियमाची घोषणा केली. एप्रिल २०२४पर्यंत या नियमाची चाचपणी करू, असे आयसीसीने तेव्हा स्पष्ट केले होते. अखेर मार्चमध्येच आयसीसीने हा नियम टी-२० व एकदिवसीय प्रकारात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

“गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत स्टॉप क्लॉकचा नियम लागू करण्यात आल्याने एका एकदिवसीय सामन्यात २० मिनिटे वाचत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासह विनाकारण वेळ दवडण्याला आवर घालण्यासह स्टॉप क्लॉकचा नियम महत्त्वाचा आहे. त्यामुळे १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकापासून हा नियम लागू करण्यात येईल,” असे आयसीसीने निवेदनात स्पष्ट केले.

“या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक षटक संपल्यावर दुसरे षटक ६० सेकंदांमध्ये सुरू करणे बंधनकारक असेल. यासंबंधी स्टेडियममध्ये मोठे डिजीटल घड्याळ लावण्यात येईल. तिसरे पंच या घड्याळाकडे लक्ष ठेवून असतील. पहिल्या दोन वेळेस ६० सेकंदांत षटक सुरू न केल्यास कर्णधाराला ताकीद देण्यात येईल. मात्र तिसऱ्या वेळेस त्या संघाला थेट ५ धावांचा दंड आकारण्यात येईल,” असेही आयसीसीने म्हटले आहे. मात्र षटकातील अखेरच्या चेंडूवर फलंदाज बाद झाल्यावर त्यादरम्यान जाणारा वेळ तसेच फलंदाज अथवा क्षेत्ररक्षकाला झालेली दुखापत व त्यासाठी लागणारा वेळ, या बाबींमध्ये हा नियम मोडणार नाही, असे आयसीसीने आवर्जून नमूद केले.

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील समावेशाबाबत संभ्रम

भारतीय संघ पाकिस्तानमध्ये २०२५ या वर्षात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणार की नाही, याविषयी अद्याप संभ्रम कायम आहे. आयसीसीच्या बैठकीत यासंबंधीही चर्चा करण्यात आली. मात्र केंद्र शासनाच्या विरोधात जाऊन पाकिस्तानमध्ये खेळण्याची विनंती आपण बीसीसीआयला करू शकत नाही, असे आयसीसीच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. २००८पासून भारतीय संघ पाकिस्तानात गेलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ गेल्या वर्षीच्या आशिया चषकाप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने अन्य देशात खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उपांत्य, अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस

आयसीसीच्या बैठकीत आगामी टी-२० विश्वचषकातील उपांत्य व अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला. टी-२० विश्वचषकात २६ व २७ जूनला उपांत्य सामने होतील, तर २९ जूनला अंतिम सामना रंगणार आहे. मात्र पाऊस अथवा अन्य कारणामुळे त्यादिवशी लढत शक्य न झाल्यास पुढील दिवशी ती खेळवता येऊ शकते. सुपर-आठ फेरीत सामन्याचा निकाल लागण्यासाठी दुसऱ्या डावात ५ षटकांचा खेळ होणे बंधनकारक असेल. बाद फेरीच्या लढतींमध्ये मात्र दुसऱ्या डावातील १० षटके झाली, तरच निकाल लागू शकेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in