
नवी दिल्ली : एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांसाठी अनुकूल होत असून एका डावात दोन चेंडू वापरण्याच्या नियमात आयसीसी बदल करण्याचा विचार करत असल्याचे समजते.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील आयसीसीच्या समितीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक चेंडू वापरण्याची शिफारस केली होती. एका दशकापेक्षा अधिक काळापासून एकदिवसीय सामन्यांत दोन चेंडू वापरले जात आहेत. हरारे येथे होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे समजते.
सध्या दोन पांढरे कुकाबुरा चेंडू एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात वापरले जातात. नवा चेंडू कडक असतो, त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजाला होता. त्यामुळे धावांची संख्याही वाढते.
एकदिवसीय सामन्यांसाठी एकाच पांढऱ्या चेंडूचा वापर करण्याच्या नियमात बदल करण्याचा विचार आयसीसीची समिती करत असल्याचे आयसीसी बोर्डाच्या एका सदस्याने वृत्तसंस्थेला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
गोलंदाजी कठीण
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३० यार्डच्या वर्तुळाबाहेर केवळ चार क्षेत्ररक्षकांची मर्यादा असल्यामुळे, दोन चेंडूंमुळे फलंदाजांना त्याचा फायदा होतो. या नियमामुळे रिव्हर्स स्विंग करण्यात गोलंदाजांना अडचणी येतात. कारण रिव्हर्स स्विंगसाठी चेंडू जुना असावा लागतो. एका डावात दोन चेंडू वापरल्याने, प्रत्येक चेंडू केवळ २५ षटकांसाठीच वापरला जातो. फिरकीपटूंनाही नव्या चेंडूवर गोलंदाजी करणे कठीण जाते.