रांचीत झालेला चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करुन भारताने मालिका खिशात घातली. या विजयानंतर भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली. भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलने दुसऱ्या डावात नाबाद ५२ धावा केल्या, तर विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलसोबत ७२ धावांची भागिदारी करून भारताला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. विराट कोहली आणि के एल राहुल संघात सामील नसतानाही टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी इंग्लंडविरोधात जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे या खेळाडूंनी आयसीसी टेस्ट बॅटिंग रॅंकिंगमध्ये उत्तुंग झेप घेतली आहे.
आयसीसीच्या आताच्या रॅंकिंगमध्ये यशस्वी जैस्वालने तीन क्रमांकांनी बढती घेतली असून तो १२ व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्यानंतर शुबमन गिलने चार क्रमांक पुढे जात ३१ वं स्थान गाठलं आहे. तर जुरेल ३१ नंबरने पुढे जात ६९ व्या स्थानी पोहोचला आहे.
या यादीत न्यूझीलंडचा केन विलियमसन जगातील नंबर फलंदाज म्हणून चांगल्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा जो रुटने रांचीत ३१ वे शतक ठोकल्यानंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा सलामी फलंदाज जॅक क्रॉलीहीनेही भारताच्या विरोधात ४२ आणि ६० धावा करून टेस्ट क्रिकेट फलंदाजांच्या क्रमवारीत १० क्रमांकाने बढती घेत १७ व्या स्थानावर पोहोचला आहे.