५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा कुंभमेळा! मुंबई, पुण्यात रंगणार एकूण १० सामने ; १९ नोव्हेंबर रोजी ठरणार विजेता

अहमदाबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, लखनऊ आणि धरमशाला या १० ठिकाणी या लढती होणार आहेत
५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा कुंभमेळा! मुंबई, पुण्यात रंगणार एकूण १० सामने ; १९ नोव्हेंबर रोजी ठरणार विजेता
Published on

अखेर १०० दिवसांचा कालावधी शिल्लक असताना मंगळवारी मुंबईत झालेल्या शानदार कार्यक्रमात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ५ ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमपासून सुरू होणारा कुंभमेळा १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादलाच येऊन संपणार आहे. महाराष्ट्राच्या चाहत्यांनाही या विश्वचषकात तब्बल १० सामन्यांचा आनंद प्रत्यक्षात स्टेडियममध्ये जाऊन लुटण्याची संधी आहे.

मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात बीसीसीआयचे सचिव जय शहा, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अलार्डीस, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या उपस्थितीत चषकाचे अनावरण करण्यासह स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले. एकूण १० संघांत ४६ दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत देशातील १० स्टेडियम्समध्ये ४८ सामने खेळवण्यात येतील.

अहमदाबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, लखनऊ आणि धरमशाला या १० ठिकाणी या लढती होणार आहेत. त्यापैकी मुंबईतील वानखेडे स्टेडियम तसेच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर प्रत्येकी ५ लढतींचे आयोजन करण्यात येईल. मुंबईकरांना पहिल्या उपांत्य लढतीचा थरारही अनुभवायला मिळणार आहे. एकूणच भारतीय संघाने या विश्वचषकात जेतेपद मिळवावे, अशीच सर्व चाहत्यांची इच्छा आहे.

logo
marathi.freepressjournal.in