लंडन : भारताचा कर्णधार शुभमन गिलने तिसऱ्या सामन्यात ड्युक्स चेंडूच्या दर्जावरून पुन्हा पंचांशी वाद घातला. चेंडू फार लवकर मऊ होत असून त्याचा आकारही बदलत असल्याने अनेक खेळाडूंनी यावर तक्रार नोंदवली होती. आता आयसीसीने याची दखल घेत इंग्लंड क्रिकेट मंडळाला ड्यूक्सच्या चेंडूची चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत.
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातील ८०व्या षटकानंतर नियमाप्रमाणे चेंडू बदलण्यात आला. मात्र या चेंडूची अवस्था काही षटकांतच खराब झाल्याने ९०.४ षटकानंतर पुन्हा चेंडू बदलण्यात आला. तसेच ९८.४ षटकानंतरही पुन्हा चेंडू बदलण्यासाठी गिलने पंचांकडे धाव घेतली. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेसुद्धा याविषयी ट्वीट करून ड्युक्सचे चेंडू दर्जाहीन होत चालल्याचे मत व्यक्त केले आहे.
तिसऱ्या कसोटापूर्वी गिलने चेंडूवर टीका करताना ३०-३५ षटकांनंतर ड्युक्सचे चेंडू स्विंग होत नाहीत. तसेच त्याचे कापड व शिलाई निघत असल्याचे सांगितले. तसेच गिल, आकाश दीप व मोहम्मद सिराज पंचांशी वाद घातलाना दिसले. इंग्लंडला फलंदाजी अधिक सोपी जावी, या हेतूने गेल्या काही वर्षांत चेंडूचा दर्जा खालावला असल्याचे काही जाणकारांचे मत आहे. त्यामुळे या चेंडूकडे पुन्हा लक्ष असेल.