बुम बुमची विश्वविक्रमी धूम! बनला जगातला १ नंबर टेस्ट बॉलर, तिन्ही प्रकारांत अव्वल क्रमांक पटकावणारा पहिलाच गोलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत ३० वर्षीय बुमराने अग्रस्थान मिळवले. त्यापेक्षाही अभिमानास्पद बाब म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) किमान एकदा तरी अग्रस्थान काबिज करणारा जसप्रीत...
बुम बुमची विश्वविक्रमी धूम! बनला जगातला १ नंबर टेस्ट बॉलर, तिन्ही प्रकारांत अव्वल क्रमांक पटकावणारा पहिलाच गोलंदाज

दुबई : जस्सी तुस्सी ग्रेट हो...! भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने बुधवारी विश्वविक्रमी पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत ३० वर्षीय बुमराने अग्रस्थान मिळवले. त्यापेक्षाही अभिमानास्पद बाब म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) किमान एकदा तरी अग्रस्थान काबिज करणारा तो विश्वातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याशिवाय प्रथमच भारताकडून एखाद्या वेगवान गोलंदाजाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची किमया साधली, हे विशेष.

भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बुमराने एकूण ९ बळी पटकावले. फलंदाजांना पोषक खेळपट्टीवरही त्याने अफलातून मारा करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे बुमराला सामनावीर पुरस्कारानेसुद्धा गौरवण्यात आले. या सामन्यात बुमराने कसोटी कारकीर्दीतील १५० बळींचा टप्पा गाठला. तसेच ऑली पोप व बेन स्टोक्स यांना बुमराने टाकलेल्या चेंडूविषयी सगळीकडे तुफान चर्चा होत आहे. बुमराने मालिकेतील दोन कसोटींतच १५ बळी मिळवले आहेत. त्यामुळेच त्याने चौथ्या स्थानावरून झेप घेत अग्रस्थान मिळवले आहे. यापूर्वी बुमराने कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानापर्यंतच मजल मारली होती. आयसीसीने बुधवारी कसोटीतील ताजा क्रमवारी जाहीर केली.

बुमराच्या खात्यात सध्या ८८१ रेटिंग गुण जमा असून कारकीर्दीत प्रथमच त्याने क्रमवारीत इतके गुण कमावले आहेत. भारताच्याच रविचंद्रन अश्विनची तब्बल ११ महिन्यांनंतर अग्रस्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत फक्त तीन बळी मिळवले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा ८५१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अश्विन (८४१) व ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (८२८) यांचा क्रमांक लागतो. रवींद्र जडेजा ७४७ गुणांसह नवव्या स्थानी आहे.

२०१८मध्ये आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या बुमराने आतापर्यंत ३४ कसोटींमध्ये १५५ बळी पटकावले आहेत. त्याला रेटिंग गुणांचा विचार करता अश्विन व जडेजाच्या पुढे जाण्याचीही संधी आहे. अश्विनने यापूर्वी २०१६मध्ये ९०४, तर जडेजाने २०१७मध्ये ८९९ रेटिंग गुणांपर्यंत मजल मारली होती.

बुमराने ‘या’ वर्षी मिळवले अग्रस्थान

कसोटी : फेब्रुवारी, २०२४

एकदिवसीय : जुलै, २०२२

टी-२० : ऑक्टोबर, २०१७

बुमरा हा जागतिक कसोटी क्रमवारीतील अग्रस्थानावर कब्जा करणारा भारताचा पहिलावहिला वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी कपिल देव यांनी १९८०च्या काळात क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले होते. मात्र आजवर भारताचा एकही वेगवान गोलंदाज कसोटीत अग्रस्थानी विराजमान झाला नव्हता.

बुमरा हा भारताकडून कसोटीत अग्रस्थान पटकावणारा एकंदर चौथा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी बिशनसिंग बेदी, रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या तिन्ही फिरकीपटूंनी ही किमया साधलेली आहे.

तिन्ही प्रकारांत किमान एकदा तरी अग्रस्थान मिळवणारा बुमरा हा एकंदर पाचवा क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग, भारताचा विराट कोहली (तिघेही फलंदाजीत) व बांगलादेशचा शाकिब अल हसन (अष्टपैलूंमध्ये) यांनी अशी कामगिरी केली होती.

विराटची घसरण, यशस्वी, गिलची आगेकूच

जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली असून तो सध्या ७६० गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. विराटने वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतली होती. दरम्यान, यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल या युवांनी मात्र आगेकूच केली आहे. द्विशतकवीर यशस्वीने ३७ स्थानांची झेप घेत २९वा क्रमांक पटकावला. गिलने १४ स्थानांनी भरारी घेत ३८वा क्रमांक प्राप्त केला. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन फलंदाजांमध्ये क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान आहे. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ व जो रूट यांचा क्रमांक लागतो. अष्टपैलूंमध्ये जडेजाने अग्रस्थान कायम राखले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in