ICC ने पाकची मागणी फेटाळली; सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांच्यावर कोणतीही कारवाई नाही; PCB ची पुन्हा नाराजी

भारत-पाक सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळल्याची तक्रार पीसीबीने आयसीसीकडे केली होती. मात्र आयसीसीने ती फेटाळून भारतावर कोणतीही कारवाई केली नाही.
ICC ने पाकची मागणी फेटाळली; सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांच्यावर कोणतीही कारवाई नाही; PCB ची पुन्हा नाराजी
Published on

दुबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करता अखिलाडूवृत्ती दाखवल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) भारताविरोधात तक्रार नोंदवली होती. तसेच या लढतीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावरही कारवाईची मागणी केली होती. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. तसेच भारताच्या कृतीवर आयसीसीने कोणतीही कारवाई केलेली नाही.

संयुक्त अरब अमिराती येथे सध्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ गडी व २५ चेंडू राखून धुव्वा उडवला. मात्र या विजयापेक्षा सर्वात जास्त चर्चा सध्या सुरू आहे ती भारताने केलेल्या कृतीची. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हेच सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आहेत. गतवर्षी जय शहा या समितीचे अध्यक्ष होते, मात्र आता ते आयसीसीचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे नक्वी यांना एसीसीचे पद मिळाले. नक्वी यांनीच याविरोधात तक्रार नोंदवून पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

पायक्रॉफ्ट यांच्या सांगण्यावरून नाणेफेकीच्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अलीशी हस्तांदोलन केले नाही, असे समजते. तसेच भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतरही हस्तांदोलन करणार नाही, असे त्यांना कळवले होते. क्रिकेटमध्ये नाणेफेक झाल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार आपापसात अंतिम ११ खेळाडूंची यादी लिहिलेला कागद अदलाबदल करतात. मात्र दोन्ही कर्णधारांनी ते केले नाही. सूर्यकुमारने आपला कागद पायक्रॉफ्ट यांच्याकडे सोपवला.

“आयसीसीने पीसीबीला मेलद्वारे उत्तर दिले असून त्यांनी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी फेटाळली आहे,” असे आयसीसीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तान-यूएई यांच्यात बुधवारी होणाऱ्या सामन्यात पुन्हा पायक्रॉफ्टच सामनाधिकारी असू शकतात. झिम्बाब्वेचे नागरिक असलेल्या ६९ वर्षीय पायक्रॉफ्ट यांनी आतापर्यंत ६९५ आंतरराष्ट्रीय लढतींमध्ये सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे.

पाकिस्तानविरुद्ध विजयी फटका लगावल्यानंतरही सूर्यकुमार शिवम दुबेसह थेट ड्रेसिंग रूमच्या दिशेने परतला. या दोघांनी पंचांसह पाकिस्तान खेळाडूंशीही हस्तांदोलन केले नाही. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानचा खेळाडू सीमारेषेजवळ येत असतानाच भारताचे सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले व एका सदस्याने दरवाजासुद्धा बंद केला. त्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू काही क्षण गोंधळलेले दिसले. त्यांचा कर्णधारही सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशनसाठी आला नाही.

गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बिघडल्यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यांची संख्या रोडावली आहे. त्यातच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी खेळू नये, अशी मागणी करण्यात येत होती. त्या हल्ल्यात भारताच्या २६ जणांचा मृत्यू झाला. मात्र केंद्र शासनाच्या सल्ल्यानुसार आयसीसी व बहुद्देशीय स्पर्धांमध्ये भारताला पाकिस्तानशी खेळणे बंधनकारक आहे. त्यामुळेच हा सामना खेळवण्यात आला.

दरम्यान, यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७व्या पर्वाची रणधुमाळी रंगणार आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. भारताची आता शुक्रवारी ओमानशी गाठ पडणार आहे.

...तर पाकिस्तानची स्पर्धेतून माघार?

पाकिस्तानची मागणी फेटाळल्यामुळे ते यूएईविरुद्धची लढत खेळणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू आहे. तसेच पाकिस्तानने सुपर-फोर फेरी गाठली व तेथेही भारत-पाकिस्तान आमनेसामने आले, तर दोन्ही देशांतील खेळाडू हस्तांदोलन करणार की नाही, याकडे लक्ष असेल. दरम्यान, पाकिस्तानने कोणत्याही कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली, तर त्यांना १२ ते १६ मिलियन अमेरिकन डॉलर (२८ कोटी ३८ लाख) इतके नुकसान होऊ शकते. नियमानुसार भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान हे पाच कसोटी दर्जा प्राप्त असलेले संघ आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) वार्षिक उत्पन्नांपैकी ७५ टक्के रक्कम विभागून घेतात. मात्र या पाचही संघांपैकी एकाने आशिया चषकातून माघार घेतली, तरी त्यांना त्यास मुकावे लागू शकते.

अपोलो टायर्स भारताच्या जर्सीचे नवे प्रायोजक

अपोलो टायर्सची भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचे मुख्य प्रायोजक म्हणून निवड झाली आहे. २०२७ पर्यंत ५७९ कोटी रुपयांमध्ये बीसीसीआयने हा करार केला आहे. या कालावधीत १२१ द्विराष्ट्रीय सामने, तर २१ आयसीसी सामने खेळवण्यात येतील.

ड्रीम ११ या ऑनलाइन गेमिंग वेबसाइटच्या गच्छंतीनंतर भारतीय संघ सध्या आशिया चषकात प्रायोजकाविना खेळत आहे. तसेच भारताच्या सरावाच्या जर्सींवरही स्पॉन्सर नसून फक्त इंडिया हे नाव ठेवण्यात आले आहे. केंद्र शासनाने नव्या धोरणानुसार गेमिंग वेवबाइट तसेच ॲप्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता अपोलो टायर्स प्रथमच भारतीय क्रिकेटशी जोडले गेले आहे. बीसीसीआयने मंगळवारी याविषयी घोषणा केली.

श्रीलंकेची हाँगकाँगवर सरशी

चरिथ असलंकाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या श्रीलंकेने सोमवारी रात्री ब-गटात हाँगकाँगवर ४ गडी व ७ चेंडू राखून मात केली. सलग दुसऱ्या विजयासह श्रीलंकेने ब-गटात अग्रस्थान मिळवले असले, तरी त्यांचे सुपर-फोर फेरीतील स्थान अद्याप पक्के नाही. प्रथम फलंदाजी करताना हाँगकाँगने २० षटकांत ४ बाद १४९ धावा केल्या. मग पथुम निसांकाच्या (४४ चेंडूंत ६८ धावा) अर्धशतकामुळे श्रीलंकेने १८.५ षटकांत विजय मिळवला. एकवेळ संघ ६ बाद १२७ अशा अडचणीत होता. मात्र दसुन शनका (नाबाद ६) व वानिंदू हसरंगा (नाबाद २०) यांनी श्रीलंकेचा विजय साकारला. श्रीलंकेची आता गुरुवारी अफगाणिस्तानशी गाठ पडेल.

logo
marathi.freepressjournal.in