India vs Pakistan: हायव्होल्टेज मुकाबला! भारत आज पाकिस्तानशी भिडणार

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपमध्ये एकापाठोपाठ धक्के बसत असले तरी अद्यापही स्पर्धेचा ज्वर म्हणावा तितका भिनलेला दिसत नाही. पण आता हा ज्वर गगनाला भिडणार आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील द्वंद्व रविवारी न्यूयॉर्कच्या स्टेडियममध्ये रंगणार असल्यामुळे अमेरिकेतील दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी पर्वणी असेल.
India vs Pakistan: हायव्होल्टेज मुकाबला! भारत आज पाकिस्तानशी भिडणार
Published on

ICC T20 Cricket World Cup: टी-२० वर्ल्डकपमध्ये एकापाठोपाठ धक्के बसत असले तरी अद्यापही स्पर्धेचा ज्वर म्हणावा तितका भिनलेला दिसत नाही. पण आता हा ज्वर गगनाला भिडणार आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील द्वंद्व रविवारी न्यूयॉर्कच्या स्टेडियममध्ये रंगणार असल्यामुळे अमेरिकेतील दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी पर्वणी असेल.

न्यूयॉर्क शहरातील आयसनहॉवर पार्कमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ३४ हजार प्रेक्षक क्षमतेच्या नासाऊ कौंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे. टी-२० वर्ल्डकपमधील हा सर्वाधिक चर्चिला जाणारा महामुकाबला असून या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र या लढतीआधीच हे स्टेडियम खूप चर्चेत आले आहे ते म्हणजे या खेळपट्टीचा अनिश्चित स्वभाव. या मैदानात आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांतील सहा डावांत फक्त दोन वेळाच शतकी धावांचा पल्ला गाठता आलेला आहे. बहुतेक सामन्यात धावांची बरसातच होत नसल्याने काही माजी क्रिकेटपटूंनी याबाबत आवाज उठवला आहे. या मैदानावरील चार खेळपट्ट्या या ॲॅडलेड ओव्हलचे ग्राऊंड्समन डॅमियन हो यांच्या देखरेखीखाली बनवण्यात आल्या असल्या तरी त्या अद्याप पूर्णपणे व्यवस्थित झालेल्या नाहीत.

चेंडूला कोणत्याही क्षणी उसळी मिळत असल्यामुळे फलंदाजांच्या सुरक्षिततेची चिंता भासू लागली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या खांद्यावर चेंडू आदळल्यामुळे त्याला ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात आपली फलंदाजी मध्येच थांबवावी लागली होती. “या खेळपट्टीकडून काय अपेक्षा करावी, हेच मला कळत नाही. खेळपट्टीचा रागरंग पाहता, आम्हाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी जय्यत तयारी करावी लागेल. या सामन्यात आमच्या सर्व खेळाडूंना वैयक्तिकदृष्ट्या योगदान द्यावे लागणार आहे,” असे रोहित शर्माने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितले होते.

भारताच्या सलामीच्या लढतीनंतर आयसीसीने पत्रक जारी करून टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूयॉर्क येथील खेळपट्ट्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. “नासाऊ कौंटी इंटरनॅशनल स्टेडियमला आयसीसीने मान्यता दिली असली तरी या खेळपट्टीवर सातत्याने सामने झालेले नाहीत,” असे स्पष्टीकरण आयसीसीने दिले आहे. पाकिस्तान संघ अद्याप नासाऊ स्टेडियमच्या वातावरणाशी सुसंगत झालेला नाही. यजमान अमेरिकेकडून धक्कादायक पराभव पत्करल्यानंतर गुरुवारी रात्री ते न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. पराभवानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीसाठी सज्ज होण्याकरिता फार कमी वेळ मिळाला आहे. भारताकडून पाकिस्तानचा संघ पराभूत झाला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. किंवा भारताला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली तरीही त्यांचा बाद फेरीतील प्रवेश अडचणीचा ठरू शकतो.

आयर्लंडविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देण्यासाठी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी दिली नव्हती. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतही तीच रणनीती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खेळपट्टीकडून चेंडू कधीही उसळी घेत असल्यामुळे संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याचीच दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात याच स्टेडियमवर सामना झाला, मात्र त्यावेळची खेळपट्टी वेगळी होती. मात्र तरीही कुलदीप यादवचा फॉर्म आणि पाकिस्तानच्या फलंदाजांविरुद्धची त्याची कामगिरी पाहता, संघ व्यवस्थापन त्याच्या समावेशाचा विचार करू शकतील. मात्र कुलदीपला संधी मिळाल्यास, अक्षर पटेल किंवा रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाला विश्रांती द्यावी लागेल.रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे अनुभवी फलंदाज पुन्हा एकदा सलामीला येण्याची शक्यता आहे तर ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. असे असले तरी भारताची फलंदाजी अद्याप स्थिरस्थावर झालेली नाही. आयर्लंडचे ९७ धावांचे माफक आव्हान पार करतानाही कोहलीला फक्त १ धावच करता आली होती. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मात्र आपल्यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. हार्दिक पंड्याने तीन विकेट्स मिळवत आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. तसेच जसप्रीत बुमरा आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत आयर्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व मिळवले होते. सलामीच्या लढतीतच अमेरिकेकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानचे पॅकअप लवकर होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या महामुकाबल्यात पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करावे लागणार आहे. अमेरिकेने सुपर-ओव्हरमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला होता. पाकिस्तानचा संघ गोलंदाजांवर अधिक अवलंबून असल्याचे कारण कर्णधार बाबर आझमने दिले असले तरी त्यांच्या फलंदाजांनाही आता पुढे येऊन चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

लढतीवर पावसाचे सावट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अमेरिकन वेळेनुसार रात्री १०.३० वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार ८ वाजता सुरू होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये रात्री ११ वाजता मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान ५१ टक्के पावसाचा अंदाज आहे. अमेरिकन हवामान विभागाचे अंदाज फारसे चुकत नाहीत, त्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील लढतीसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाचा व्यत्यय येऊन सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण बहाल करण्यात येईल.

कडक सुरक्षाव्यवस्था तैनात

इसिसकडून दहशतवादी हल्ल्याची धकमी आल्यानंतर भारत-पाकिस्तान लढतीसाठी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नासाऊ कौंटीचे पोलीस आयुक्त पॅट्रिक रायडर म्हणाले की, “देशाच्या अध्यक्षांना दिली जाणारी सुरक्षाव्यवस्था या सामन्यासाठी तैनात करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना काही वर्षांपूर्वी दिली जाणारी सुरक्षा या सामन्यासाठी असेल. या सामन्यासाठी नासाऊ कौंटी पोलीस, सफोल्क कौंटी तसेच न्यूयॉर्क राज्याचे पोलीस तैनात असतील. त्याचबरोबर एफबीआय, होमलँड सुरक्षा एजन्सी आणि यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन या सामन्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

> भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झाले असून भारताने आठ विजय मिळवले आहेत. पाकिस्तानला फक्त तीनच सामने जिंकता आले आहेत तर एक सामना टाय ठरला होता, त्यात भारताने बोल-आऊटमध्ये विजय मिळवला होता.

> भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या गेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामने भारताने जिंकले असून पाकिस्तानला दोनच लढतीत विजय मिळवता आला आहे.

> भुवनेश्वर कुमार हा टी-२०मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला असून त्याने ७ सामन्यांत ११ विकेट्स टिपल्या आहेत. उमर गुल हा पाकिस्तानचा यशस्वी गोलंदाज असून त्याच्या नावावर ६ सामन्यांत ११ विकेट्स जमा आहेत.

> टी-२० वर्ल्डकपमध्ये उभय संघ ७ वेळा एकमेकांशी भिडले असून भारताने सर्वाधिक पाच लढती जिंकल्या आहेत. पाकिस्तानने एक विजय मिळवला असला तरी एका टाय लढतीत भारताने बोल-आऊटमध्ये बाजी मारली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या गेल्या टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यात विराट कोहलीच्या झंझावातामुळे भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सनी सरशी साधली होती.

> विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध ८१.३३ च्या सरासरीने १० सामन्यांत ४८२ धावा फटकावल्या आहेत. भारताकडून युवराज सिंगने ८ सामन्यांत १५५ धावा केल्या आहेत. दुसरीकडे पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने भारताविरुद्ध ४ सामन्यांत १९७ धावा ठोकल्या आहेत. शोएब मलिकने ९ सामन्यांत १६४ तर मोहम्मह हाफीझने ८ सामन्यांत १५६ धावा केल्या आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

> भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.

> पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर झमान, हॅरिस रौफ, इफ्तिकार अहमद, इमास वासिम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयूब, शादाब खान, शाहिन शाह आफ्रिदी.

> वेळ : सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

> सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी वाहिनी आणि हॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in