ICC T20 World Cup 2026 : इंग्लंडचा न्यूझीलंडला धक्का! सुपर-आठ फेरीत सलग तिसऱ्या विजयाची नोंद; जॅक्सची अष्टपैलू चमक

विल जॅक्सने (१८ चेंडूंत नाबाद ३२ धावा, २ बळी) पुन्हा एकदा अष्टपैलू चमक दाखवली. त्यामुळे इंग्लंडने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी सुपर-आठ फेरीत सलग तिसरा विजय नोंदवताना न्यूझीलंडला ४ गडी व ३ चेंडू राखून पराभूत केले. न्यूझीलंडला धक्का बसल्याने त्यांना उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी आता शनिवारी पाकिस्तानच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.
ICC T20 World Cup 2026 : इंग्लंडचा न्यूझीलंडला धक्का! सुपर-आठ फेरीत सलग तिसऱ्या विजयाची नोंद; जॅक्सची अष्टपैलू चमक
ICC T20 World Cup 2026 : इंग्लंडचा न्यूझीलंडला धक्का! सुपर-आठ फेरीत सलग तिसऱ्या विजयाची नोंद; जॅक्सची अष्टपैलू चमकPhoto : X
Published on

कोलंबो : विल जॅक्सने (१८ चेंडूंत नाबाद ३२ धावा, २ बळी) पुन्हा एकदा अष्टपैलू चमक दाखवली. त्यामुळे इंग्लंडने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी सुपर-आठ फेरीत सलग तिसरा विजय नोंदवताना न्यूझीलंडला ४ गडी व ३ चेंडू राखून पराभूत केले. न्यूझीलंडला धक्का बसल्याने त्यांना उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी आता शनिवारी पाकिस्तानच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सुपर-आठ फेरीच्या दुसऱ्या गटातील लढतीत न्यूझीलंडने दिलेले १६० धावांचे लक्ष्य इंग्लंडने १९.३ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. टॉम बँटन (३३), कर्णधार हॅरी ब्रूक (२६), सॅम करन (२४) यांनीही उत्तम योगदान दिले. इंग्लंडने याबरोबरच गटातून सर्वाधिक ६ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. आता त्यांची ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उपांत्य लढत होईल. इंग्लंडसमोर भारत किंवा वेस्ट इंडिजचे आव्हान असू शकते.

दुसरीकडे न्यूझीलंडचे ३ सामन्यांत ३ गुण आहेत. पाकिस्तानचे दोन सामन्यांत १ गुण आहेत. त्यामुळे शनिवारी पाकिस्तानने श्रीलंकेला मोठ्या फरकाने नमवले, तर न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. न्यूझीलंडची धावगती (नेट रनरेट) १.३९० इतकी आहे, तर पाकिस्तानची धावगती -०.४६१ इतकी आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला ६४ धावांच्या फरकाने नमवले किंवा त्यांनी दिलेले लक्ष्य १३.१ षटकांत गाठले, तरच ते धावगतीमध्ये न्यूझीलंडच्या पुढे जाऊ शकतात. त्यामुळे शनिवारचा दिवस निर्णायक ठरेल.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला २० षटकांत ७ बाद १५९ धावाच करता आल्या. टिम सेईफर्ट (३५), ग्लेन फिलिप्स (३९) व फिन (२९) यांनी संयमी फलंदाजी केली. मात्र फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर विल जॅक्स, आदिल रशिद व रेहान अहमद या त्रिकुटाने प्रत्येकी २ बळी मिळवत न्यूझीलंडला रोखले. मग इंग्लंडने फिल सॉल्ट (२), जॉस बटलर (०) यांना दुसऱ्याच षटकात गमावूनही जॅक्स, बँटनच्या बळावर २०व्या षटकात विजय मिळवला. जॅक्स या विश्वचषकात चौथ्यांदा सामनावीर ठरला. त्याने सातत्याने योगदान दिले आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : २० षटकांत ७ बाद १५९ (टिम सेईफर्ट ३५, ग्लेन फिलिप्स ३९; विल जॅक्स २/२३) पराभूत वि.

इंग्लंड : १९.३ षटकांत ६ बाद १६१ (टॉम बँटन ३३, विल जॅक्स नाबाद ३२; रचिन रवींद्र ३/१९)

सामनावीर : विल जॅक्स

logo
marathi.freepressjournal.in