ICC T20 World Cup 2026 : पाकिस्तान धक्का देणार की इंग्लंड बाजी मारणार? आज इंग्लंड-पाकिस्तान द्वंद्व!

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी सुपर-आठ फेरीतील दुसऱ्या गटात इंग्लंड-पाकिस्तान आमनेसामने येतील. इंग्लंडचा संघ या स्पर्धेत उत्तम लयीत असला तरी अनुभवी जोस बटलरच्या कामगिरीची त्यांना चिंता सतावत आहे. दुसरीकडे पाकिस्तान इंग्लंडला धक्का देण्यास आतुर असेल.
ICC T20 World Cup 2026 : पाकिस्तान धक्का देणार की इंग्लंड बाजी मारणार? आज इंग्लंड-पाकिस्तान द्वंद्व!
Published on

पाल्लेकेले : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी सुपर-आठ फेरीतील दुसऱ्या गटात इंग्लंड-पाकिस्तान आमनेसामने येतील. इंग्लंडचा संघ या स्पर्धेत उत्तम लयीत असला तरी अनुभवी जोस बटलरच्या कामगिरीची त्यांना चिंता सतावत आहे. दुसरीकडे पाकिस्तान इंग्लंडला धक्का देण्यास आतुर असेल.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तान, ब-गटातून झिम्बाब्वे, श्रीलंका, क-गटातून वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ड-गटातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांनी आगेकूच केली. आता सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले आहेत. यांपैकी पहिल्या गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ आहेत. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.

दरम्यान, हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडने सुपर-आठ फेरीच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ५१ धावांनी धूळ चारली होती. १४६ धावा केल्यावरही गोलंदाजांनी त्याचा यशस्वी बचाव करताना श्रीलंकेला ९५ धावांतच गुंडाळले. विल जॅक्स अष्टपैलू योगदान देत असून जोफ्रा आर्चर, सॅम करन हे वेगवान गोलंदाजही लयीत आहेत. तसेच फिल सॉल्टने अर्धशतक झळकावून सूर गवसल्याचे संकेत दिले. मात्र ३५ वर्षीय बटलरला पाच सामन्यांत एकही अर्धशतक साकारता आलेले नाही. त्याने अनुक्रमे २६, २१, ३, ३, ७ अशा धावा केल्या आहेत. त्यामुळेच इंग्लंडच्या मधल्या फळीवर दडपण येत असून बटलरला कामगिरी उंचवावी लागणार आहे.

दुसरीकडे सलमान अघाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानचा सुपर-आठ फेरीत न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे त्यांना एक गुण मिळाला आहे. आता पाल्लेकेलेच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचे फिरकीपटू विरुद्ध इंग्लंडचे फलंदाज असे द्वंद्व पाहायला मिळेल. उस्मान तारिक, सय्यम अयूब, शादाब खान असे फिरकीपटू पाकिस्तानकडे आहेत. फलंदाजीत साहिबझादा फरहानवर अधिक भिस्त असेल. अनुभवी बाबर आझमला अद्याप लौकिकाला साजेसा खेळ करत आलेला नाही. त्यामुळे त्याच्यावरही दडपण असेल.

पाल्लेकेले येथे होणाऱ्या या लढतीवर पावसाचे सावट नसेल. त्यामुळे चाहत्यांना दर्जेदार खेळ पाहायला मिळू शकतो.

सुपर-आठ (दुसरा गट)

इंग्लंड वि. पाकिस्तान

प्रतिस्पर्धी संघ

पाकिस्तान : सलमान अघा (कर्णधार), बाबर आझम, फखर झमान, ख्वाजा नफाय, साहिबझादा फरहान, उस्मान खान, फहीम अश्रफ, मोहम्मद नवाझ, सय्यम अयूब, शादाब खान, अब्रार अहमद, नसीम शाह, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक.

इंग्लंड : हॅरी ब्रूक (कर्णधार), बेन डकेट, जोफ्रा आर्चर, रेहान अहमद, जोश टंग, लुक वूड, सॅम करन, फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), जोस बटलर, जेमी ओव्हर्टन, जेकब बेथल, लियाम डॉसन, विल जॅक्स, आदिल रशिद, टॉम बँटन.

स्थळ : पाल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पाल्लेकेले

वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून

logo
marathi.freepressjournal.in