

नवी दिल्ली : इशान किशन (२४ चेंडूंत ६१ धावा), हार्दिक पंड्या (२८ चेंडूंत ५२ धावा, २ बळी) आणि वरुण चक्रवर्ती (७ धावांत ३ बळी) या त्रिकुटाने गुरुवारी शानदार कामगिरी केली. त्यामुळे भारताने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवताना नामिबियाला ९३ धावांनी नामोहरम केले. या बरोबरच भारताने अ-गटात अग्रस्थानी झेप घेतली.
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने २० षटकांत ९ बाद २०९ धावांपर्यंत मजल मारली. भारताची ही विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात नामिबियाचा संघ १८.२ षटकांत ११६ धावांत गारद झाला. लॉरेन स्टीनकॅम्प (२९) व जॅन फ्रेलिंक (२२) वगळता कोणीही प्रतिकार करू शकला नाही. फिरकीपटू वरुणने ३ बळी घेत नामिबियाला रोखले. अक्षर पटेल व हार्दिक यांनी प्रत्येकी २, तर जसप्रीत बुमरा, शिवम दुबे व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. अष्टपैलू योगदान देणाऱ्या हार्दिकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताचा आता पुढील सामना रविवारी पाकिस्तानशी होईल. तर त्याच दिवशी नामिबियाची अमेरिकेशी गाठ पडेल.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.
जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताने पहिल्या साखळी सामन्यात वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले. मग गुरुवारीसुद्धा भारतावर प्रथम फलंदाजीची वेळ आली. अपेक्षेप्रमाणे अभिषेक शर्माला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अवधी देण्यात आल्याने संजू सॅमसनला सलामीसाठी पाचारण करण्यात आले. तसेच मोहम्मद सिराजच्या जागी बुमरा संघात परतला.
संजू सॅमसन २२ धावा फटकावून बाद झाला. मात्र किशनने अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक तडकावले. तो बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या ७ षटकांत २ बाद १०४ इतकी होती. त्यानंतर तिलक वर्मा (२५), सूर्यकुमार (१२) लवकर बाद झाले. मात्र हार्दिकने शिवम दुबेच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचून भारताला २०० धावांपलीकडे मजल मारून दिली.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ९ बाद २०९ (इशान किशन ६१, हार्दिक पंड्या ५२; जेराल्ड इरॅस्मस ४/२०) विजयी वि. g नामिबिया : १८.२ षटकांत सर्व बाद ११६ (लॉरेन स्टीनकॅम्प २९, जॅन फ्रेलिंक २२; वरुण चक्रवर्ती ३/७, अक्षर पटेल २/२०)
सामनावीर : हार्दिक पंड्या