अहमदाबाद : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयरथावर स्वार असलेला भारतीय संघ बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत सलामीवीर अभिषेक शर्माला सूर गवसावा, अशीच अपेक्षा भारताचे चाहते बाळगून आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने सुपर-आठ फेरीतील स्थान आधीच पक्के केले असल्याने प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील.
दरम्यान, जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताने पहिल्या साखळी सामन्यात वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले. मग दुसऱ्या लढतीत त्यांनी नवी दिल्ली येथे नामिबियाला ९३ धावांनी नामोहरम केले. रविवारी मग पाकिस्तानला कोलंबोत धूळ चारून भारताने विजयाची हॅटट्रिक साकारली. भारताची फलंदाजी तसेच गोलंदाजी दोन्ही विभाग उत्तम लयीत आहेत. मात्र सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या अभिषेकच्या बॅटमधून धावा होणे गरजेचे असेल.
दुसरीकडे नेदरलँड्सने ३ पैकी १ लढत जिंकली आहे. त्यांना अद्याप आगेकूच करण्याची संधी असली, तरी भारताला नमवणे सोपे नसेल. तसेच त्यांना पाकिस्तान-नामिबिया यांच्यातील लढतीवरही विसंबून रहावे लागेल. नेदरलँड्सची धावगती अधिक सुमार आहे. २०२२मध्ये फक्त एकदाच टी-२० विश्वचषकातच भारत-नेदरलँड्स आमनेसामने आले होते. त्यावेळी भारताने विजय मिळवला होता.
पाकिस्तान-नामिबिया लढतीकडे लक्ष
विश्वचषकात बुधवारी पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात लढत होणार आहे. अ-गटातून दुसऱ्या स्थानासह आगेकूच करण्यासाठी पाकिस्तानला ही लढत जिंकणे अनिवार्य आहे. मात्र नामिबियाने उलटफेर केला, तर अमेरिका किंवा नेदरलँड्सला आगेकूच करण्याची संधी आहे. अमेरिका व पाकिस्तान दोघांचेही सध्या चार गुण आहेत. अमेरिकेची धावगती पाकिस्तानपेक्षा सरस आहे. त्यामुळे पाकिस्तान पराभूत झाल्यास त्यांच्या आशा बळातील. बुधवारी सकाळी आफ्रिका-यूएई लढत होईल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स : स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन एकरमॅन, नोह क्रोस, बॅस डी लीडे, आर्यन दत्त, फ्रेड क्लासेन, कायले क्लेन, मिचेल लेविट, झॅच लायन, मॅक्स ओ’डाऊड, सकिब झुल्फिकर, लोगान वॅन बीक, रोलेफ वॅन डर मर्व्ह, पॉल वीन मीकरन.
वेळ : सायंकाळी ७ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप